डॉग स्कॉडचा सिग्नल अन् तपासणीत गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये आढळला दोन लाख 62 हजारांचा गांजा

भुसावळात सतर्क रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई : कारवाईच्या धाकाने संशयित अंडर ग्राऊंड


Two lakh 62 thousand ganja found in Gandhidham Express भुसावळ  : 20803 अप पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून भुसावळात सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने दोन लाख 62 हजार रुपये किंमतीचा सुमारे 26 किलो गांजा पकडल्याने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई शुक्रवार, 27 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करण्यात आली.

डॉग स्कॉडला संशय अन् गांजा जप्त
राजस्थानसह मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगना व मिझोरम राज्यात आगामी काळात होणार्‍या निवडणुका लक्षात घेता रेल्वेतून पैसै, दारू व अन्य वस्तूंची तस्करी होवू न देण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे गाड्यांमध्ये कडेकोट बंदोबस्तात तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी भुसावळातील डॉग स्कॉड पथकातील ‘वीरू’ श्वानासह प्रधान आरक्षक संजय पाटील व प्रधान आरक्षक जितेंद्र इंगळे हे अकोला येथून परतीच्या प्रवासात 20803 अप पुरी-गांधीधाम एक्स्प्रेची तपासणी करीत असताना बोगी क्रमांक एस- 9 च्या शौचालयात काहीतरी संदिग्ध वस्तू असल्याचा संदेश (सिग्नल) पथकाला आचेगाव स्थानक सोडल्यानंतर दिला. यावेळी पथकाने तातडीने स्टेशन निरीक्षक आर.के.मीना यांना याबाबत सूचित केले.



भुसावळात तपासणी मात्र संशयित पसार
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक चारवर येताच आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक के.आर.तर्डे, उपनिरीक्षक अनिल कुमार तिवारी, उपनिरीक्षक विनोद खरमाटे, एसआयबीचे एएसआय वसंत महाजन, सीआयबीचे विजय पाटील, हवालदार योगेश पाटील, हवालदार धनराज लुले यांनी बोगी क्रमांक एस- 9 च्या शौचालयातून दोन संदिग्ध अवस्थेतील गोण्या जप्त करीत रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात आणल्या. एका गोणीत सात तर दुसरीत सहा बंडल खाकी कलरच्या टेपने पॅक केलेले असल्याने भुसावळ नायब तहसीलदार शोभा घुले यांना सूचित केल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत बंडल फोडल्यानंतर त्यात ओलसर गांजा आढळला. 26 किलो 258 ग्रॅम वजनाचा व दोन लाख 62 हजार 580 रुपये किंमतीचा गांजा यावेळी रेल्वे सुरक्षा बलाने जप्त केला. ही कारवाई मंडळ सुरक्षा आयुक्त एच.श्रीनिवास राव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !