दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन वंचितांचे तोंड गोड करा…
भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष
भुसावळ : भुसावळ शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या वस्त्यात दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी-वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नवीन कपडे, नवीन चपला, बूट आणि शालेय साहित्य, किराणा गोळा करायचा व गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्याठिकाणी दिवाळी साजरी करायची असा हा उपक्रम आहे. यंदा उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.
समाज भावनेतून उपक्रम
समाजाचे आपण काही देण लागतो या भावनेतून अंतर्नाद प्रतिष्ठानने 2016 मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी, दुसर्या वर्षी जोगलखोरी व रावेर तालुक्यातील जुनी मोहमांडली येथे, तिसर्या वर्षी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण, विटवा या वस्तीवर तर चवथ्या वर्षी वड्री धरणाजवळील आसराबारी, पाचव्या वर्षी जामुनझिरा, सहाव्या वर्षी डोंगरदे, सातव्या वर्षी गायरान या आदिवासी वस्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील नागादेवी आदिवासी पाड्यावर शनिवार, 11 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.






यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप
शहरवासीयांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरूप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी व्यक्त केला आहे. ज्यांना शक्य नसेल पण देण्याचे सुख अनुभवायच असेल त्यांनी नवीन कपडे, जुने कपडे स्वच्छ धुवून व इस्त्री करून द्यावे. फराळ द्यायचा असेल तर उपक्रम समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख जीवन महाजन, समन्वयक प्रदीप सोनवणे, सहसमन्वयक समाधान जाधव, सहसमन्वयक योगेश इंगळे यांनी केले आहे.
यांचे उपक्रमासाठी परीश्रम
उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, डॉ.संजू भटकर, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, शैलेंद्र महाजन, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, राजेंद्र जावळे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, डॉ.श्यामकुमार दुसाने, भूषण झोपे, राहुल भारंबे, ललित महाजन, निवृत्ती पाटील, हितेंद्र नेमाडे, जीवन सपकाळे, हरीश भट, संदीप रायभोळे, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, मंगेश भावे, संदीप सपकाळे,महेश फिरके अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परीश्रम घेत आहेत.
नवे जुने कपडे गोळा करणार
गेल्या वर्षी या उपक्रमात फराळासह नवे आणि जुने कपडे गोळा करण्यात आले होते. ते जवळपास 450 व्यक्तींना वाटप करण्यात आले. .सोबतच फराळ, नवीन चपला, शालेय साहित्य, साखर, तांदूळ सुद्धा वाटप करण्यात आला. यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर , ब्लँकेट असतील ते आणि इतर मदत प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे 9 नोव्हेंबरपर्यंत द्यावी , असे आवाहन प्रकल्प प्रमुख जीवन महाजन यांनी केले आहे.


