भुसावळातील मृत पोलिस कर्मचार्याच्या वारसांना 44 लाख 77 हजारांच्या भरपाईचे आदेश
भुसावळ मोटार अपघात प्राधिकरणाचा निर्वाळा : सात वर्षानंतर मिळाला न्याय
Order for compensation of 44 lakh 77 thousand to the heirs of the deceased policeman in Bhusawal भुसावळ : शहरातील रहिवासी असलेले पोलिस कर्मचारी शामकुमार चिंधू चौधरी यांचा नागपूर येथे प्रशिक्षणादरम्यान 30 डिसेंबर 2015 रोजी अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांच्या वारसांना मोटार प्राधिकरणाने 45 लाख 77 हजार 864 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
अपघातात पोलिसाचा झाला मृत्यू
पोलिस कर्मचारी शामकुमार चौधरी हे नागपूर येथे प्रशिक्षणासाठी गेले असता प्रशिक्षणादरम्यान 30 डिसेंबर 2015 रोजी महिंद्रा कंपनीची कंमाडर जीप (एम.एच. 31 ए. जी. 9159) वर पोलिस वाहन चालक नवीन युनिस अॅन्थोनी हा चालकाचे प्रशिक्षण घेत असतांना वाहनाचे नियंत्रण सुटले. या अपघातात चौधरी यांचा मृत्यू ओढवला.


मयताची पत्नी दीपाली चौधरी व अवघ्या तीन वर्षांची मुलगी लावण्या, आई कुसूम चौधरी व मयताचे वडील चिंधू चौधरी वारस होते. या अपघाताने व्यथित होवून मयताच्या वारसांनी मोटर अपघात प्राधिकरण, जळगाव येथे 24 जून 2016 रोजी अपघात कायदा तरतुदी अन्वये नुकसान भरपाई मिळण्यासाठी वाहन चालक नवीन युनिस अॅन्थोंनी व वाहन मालक पोलिस निरीक्षक फोरमन सी.एम.टी. वर्कशॉप, नागपूर यांच्या विरोधात दावा दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली. ही याचिका भुसावळ येथे मोटर अपघात प्राधिकरणासमोर वर्ष 2021 मध्ये वर्ग करण्यात आली.
या प्रकरणी 45 लाख 77 हजार 864 रुपये ही रक्कम मयताचे वारस यांना समप्रमाणात एक चतुर्थ हिस्से प्रमाणे 7.5 टक्के व्याज प्रकरण दाखल झाल्यापासून द्यावी, असे आदेश मोटर अपघात प्राधिकरण, भुसावळ तथा जिल्हा न्यायालय, दुसरे कोर्ट भुसावळ सदस्य विजय सी.बर्डे यांनी पारीत केले. या प्रकरणात मयताचे वारस दीपाली चौधरी वगैरेतर्फे अॅड.राजेश एस.उपाध्याय यांनी प्रभावी बाजू मांडली.