पिंपरूळ-वढोदा रस्त्यावर दुचाकी अपघात : वढोद्यातील प्रौढ ठार
Two-wheeler accident on Pimprul-Vadhoda road : Adult from Vadhoda killed यावल : यावल तालुक्यातील पिंपरूड-वढोदा रस्त्यावर दुचाकी घसरून 41 वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू
पिंपरूळ, ता.यावल येथून वढोदा दरम्यान रस्त्यावरून किरण देवराम सपकाळे (41, वढोदा, ता.यावल) हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.बी.8505) व्दारे वढोदा येथे जात असताना गोपाळ हिरामण पाटील यांच्या शेताजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली व त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली.


घटनास्थळावरून तातडीने त्यांना उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.या ठिकाणी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लीलाधर सपकाळे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे.