‘बाजाराची दिवाळी’ : लक्ष्मी, कुबेर पूजनासह रांगोळ्यांनी सजली घरे
मुहूर्तावर घरोघरी लक्ष्मीपूजन : फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दणाणला ; कोट्यवधींची उलाढाल
‘Market Diwali’ : Houses decorated with rangolis along with Lakshmi, Kuber Pujan भुसावळ : प्रकाशाचे पर्व असलेल्या दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शहरात बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलली होती. रविवारी सकाळीच नागरीकांनी बाजारपेठ गाठत ऊस, लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजा विधीचे साहित्य खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी केली. केरसुणी, लक्ष्मी मूर्ती, साळीच्या लाह्या, बत्ताशे, पानेफुले यासह दुचाकी, चारचाकी तसेच कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीच्या माध्यमातून बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली.
उत्साही वातावरणात लक्ष्मीपूजन
दारांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले द्वार अन् आकाशकंदील, पणत्या, दीपमाळेचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात रविवारी सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन झाले. यानिमित्ताने घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्री लक्ष्मीची, वह्या आणि खाते पुस्तिकांची मनोभावे पूजा करण्यात आली. त्यानंतर मुक्त हस्ते झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत आसमंत न्हाऊन निघाला. रविवारी सायंकाळी लक्ष्मी पूजनाची लगबग सुरू झाली. शहरातील दुकानेही आकर्षकरीत्या सजवण्यात आली. दिवे उजळले अन् पारंपरिक वेशभूषा परीधान केलेल्या कुटुंबीयांनी मुहूर्त साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचे पूजन केले.






बाजाराला पावली दिवाळी
रविवारी लक्ष्मी पूजनासाठी सकाळीच बाजारपेठेत ग्राहकांनी तोबा गर्दी केली तर मिळेल त्या जागेवर विक्रेत्यांनी दुकाने थाटली. केरसुणी विक्रेते, साळीच्या लाह्या विक्रेते, पूजेसाठी लागणारी पाच फळे, रांगोळ्या, लक्ष्मीची पावले, लक्ष्मी मूर्ती, कपडे खरेदी, साड्या खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी या सोबतचे सोन्याच्या वस्तूंसह दुचाकी व चारचाकींच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आले. ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने ग्रामस्थ दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात दाखल झाले होते. शहरात तीन ते चार लाख पणत्यांची विक्री झाली व त्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.
कमळासह झेंडूची फुले भाव खावून
लक्ष्मी पूजनासाठी लागणारी कमळाची फुले मोठ्या संख्येने नागरीकांनी विकत घेतली. 10 रुपयांप्रमाणे फुलांची विक्री झाली तर त्यासाठी अहमदाबाद व इंदूर येथून विक्रेते शहरात आले होते. झेंडूच्या फुलांनादेखील मोठी मागणी राहिली. 60 रुपये किलो प्रमाणे झेंडूचा दर राहिला. पूजेसह वाहनांना व दुकानांना दर्शनी भागात हार लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यात आली. कुंभार बांधवांनी लक्ष्मी मूर्तीची दुकाने लावली होती तर परराज्यातूनही आकर्षक मूर्ती विक्रीसाठी स्थानिक विक्रेत्यांनी आणल्या होत्या. शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत म दर राहिले.
फटाक्यांच्या आतषबाजीने आसंमत दणाणला
शहरातील व्यापार्यांनी दुपारनंतर व्यवहारासोबतच दुकाने सजवण्यास प्राधान्य दिले. दुकानांपुढे पाण्याचा सडा टाकून आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या, खाते पुस्तिका आणि दुकानाची पूजा पार पडली. यानिमित्ताने बाजारात आनंदोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले. पूजा विधीनंतर गूळ, लाह्या, बत्ताशासह मिठाईचे वाटप करत व्यापार्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अन् फटाक्यांची मनमुराद आतषबाजी केली. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीने आसंमत दणाणत राहिला.
कोट्यवधींची उलाढाल : व्यापारी सुखावले
प्रकाश पर्वाच्या उत्सवात सर्वच व्यावसायीकांना दीपावली पावल्याचे चित्र राहिले. शहरातील कपडा मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली तर अनेक दुकानांबाहेर ग्राहक वेटींग रांगेत दिसले तर छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये आज तोबा गर्दी झाली होती या शिवाय सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ राहिली. शहरात दिवाळीच्या मुहूर्तावरही अनेकांनी विविध कंपन्यांच्या दुचाकीसह बुलेटची तसेच कारची खरेदी केली. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या दुकानातून एलईडीसह फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, डीश वॉशर खरेदी करण्यात आले शिवाय त्यासाठी फायनान्ससह आकर्षक सुटही देण्यात आली.


