भुसावळातील भरदिवसा झालेल्या घरफोडीचा उलगडा : गडचिरोलीतील कुविख्यात दरोडेखोर जाळ्यात
घरभरणीच्या कार्यक्रमास आला अन् जाळ्यात अडकला : कुविख्यात आरोपीविरोधात अनेक गुन्हे
Bhusawal house burglary revealed : Notorious robbers in Gadchiroli’s net भुसावळ : दिवाळीच्या खरेदीसाठी कुटूंब घराबाहेर पडताच चोरट्यांनी घर फोडून एक लाख 10 हजारांचा ऐवज लांबवला होता. शहरातील नाहाटा चौफुली भागात 7 नोव्हेंबर रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीने या परीसरात खळबळ उडाली होती. बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज भागातून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. व्यंकटी रामा गोडमारे (38) व हितेश देविदास ठेंगरी (28, देसाईगंज, गडचिरोली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपी गोडमारे हा कुविख्यात आरोपी असून त्याच्याविरोधात गडचिरोली जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
कुटूंब बाहेर पडताच चोरटे दारावर
शिवदास दौलत पाटील हे कुटूंबासह नाहाटा चौफुलीजवळील हुडको कॉलनीत वास्तव्यास आहेत. मंगळवार, 7 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या खरेदीसाठी पाटील कुटूंब सकाळी 11.30 वाजता बाहेर पडले. ही संधी चोरट्यांनी हेरत बंद घराचे कुलूप तोडून 25 हजारांची रोकड व 85 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे लांबवले. पाटील कुटूंब खरेदी करून आल्यानंतर दुपारी घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवली.


पाहुणचारानंतर आरोपीचे मिळाले धागेदारे
भर दिवसा झालेल्या घरफोडीनंतर बाजारपेठ पोलिसांनी हुडको कॉलनी परीसरातील चोरी झालेल्या घराजवळील तसेच येणार्या-जाणार्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका ठिकाणी संशयित पायी चालताना दिसून आला मात्र फुटेज काहीसे स्पष्ट नसल्याने ओळख पटण्यास अडचण होत होती. पोलिसांनी हार न मानता तपास सुरू ठेवला व नाहाटा कॉलेज परीसरातील शिवभोजन केंद्रातील फोटो तपासल्यानंतर त्यात आरोपीने स्वस्तातील जेवण घेतल्याचे निष्पन्न झाले मात्र हा डाटा तहसीलकडे जात असल्याने फोटो मिळण्याची अडचण निर्माण झाली तर शासकीय सुट्यांचे दिवस संपल्यानंतर तहसील कार्यालय उघडताच आरोपीचा स्पष्ट फोटो मिळाला मात्र पत्ता फेक असल्याने पुन्हा शोध मोहिमेला बाधा निर्माण झाली मात्र खात्रीशीर खबर्याने आरोपी गडचिरोली भागातील असल्याची पक्की टिप दिल्यानंतर पोलिसांचे पथक रवाना झाले.
कार्यक्रमाला आला अन जाळ्यात अडकला
आरोपी व्यंकटी रामा गोडमारे हा त्या भागातील कुविख्यात असल्याने सहजा-सहजा तरी घरी परतत नव्हता कारण सर्वदूरच्या पोलिसांमार्फत त्याचा शोध सुरू होता मात्र गोडमारेच्या जवळच्या नातेवाईकाकडे घर भरणी असल्याने तो कार्यक्रमास येणार म्हणजे येणारच, अशी टिप मिळाल्याने पथकाने फिल्डींग लावली. कुणी दारूच्या गुत्त्यावर तर कुणी पानटपरी साध्या वेशात थांबले. संशयिताला दारूचे व्यसन असल्याने तो दारूच्या गुत्त्यावर येताच त्याच्या पोलिसांच्या पथकाने मुसक्या बांधल्या व भुसावळात आणले. आरोपीने पकडल्यानंतर ‘मी नाही त्यातला नाहीच’ असा पाढा वाचला मात्र भुसावळात आणल्यानंतर त्याने पोपटासारखी गुन्ह्याची कबुली दिली मात्र गुन्ह्यातील मुद्देमाल गडचिरोलीत विकल्याची कबुली दिल्यानंतर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दमलेले पथक आल्या पावली पुन्हा गडचिरोलीत पोहोचले व गुन्ह्यातील मुद्देमालाची रीकव्हरी करण्यात आली. 11 ग्रॅम सोन्याची लगड व दोन हजार 700 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून आरोपींची सध्या जळगाव कारागृहात रवागनी करण्यात आली आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार रमण सुरळकर, कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.
