भुसावळात दोन होमगार्डसह टोळीने टाकला दरोडा : दोघांना पडल्या बेड्या

सफेद भिलाव्याच्या बहाण्याने परप्रांतीय तरुणांना मारहाण करीत लुटले : कुर्‍ह्यातील चौकडी पसार


Robbery committed by a gang with two home guards in Bhusawal : Both arrested भुसावळ : सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील तरुणांना भुसावळात बोलावून मारहाण करीत लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील रेल्वे स्थानक ते साक्री फाट्यावरील जुना टोलनाक्यादरम्यान सोमवाीर सकाळी घडली. बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जाडगाव, ता.भुसावळ येथील दोन होमगार्डला अटक करण्यात आली. मारहाण व लूट प्रकरणात होमगार्डचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. दोघा संशयितांचा बडतर्फीचा अहवाल संबंधित वरीष्ठ अधिकार्‍यांना पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

खदानीत नेत मारहाण करीत लूटले
मिलवकुमार पूनम (28, कोयागुड्डम मंडळ तेगुपल्ली, जि.बद्रादी, तेलगंना) यांना युट्यूबवर सफेद भिलावा संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडिओखाली दिलेल्या संपर्क साधल्यानंतर संशयितांनी त्यांना भुसावळात बोलावले. ठरल्याप्रमाणे सोमवार, 11 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता पूनम व त्यांचा मित्र बुकीया हरीलाल हे भुसावळात आले व रेल्वे स्थानकाबाहेर संशयिताची भेट झाल्यानंतर त्यांनी साक्री फाट्याजवळील जुना टोल नाक्याजवळील खदानीत नेत काठीने मारहाण सुरू केली. संशयितांनी यावेळी 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, 20 हजारांची रोकड, 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा एकूण 42 हजारांचा ऐवज हिसकावून संशयित पसार झाले.



दोघा होमगार्डला बेड्या
पूनम यांनी भेदरलेल्या अवस्थेत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगितल्यानंतर अशोक मोहितेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराशी आरोपींनी साधलेला संपर्क क्रमांक तसेच स्टेशन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजआधारे संशयित विनोद चंद्रकांत सोनवणे (30, जाडगाव, ता.भुसावळ) व नरेंद्र विकास सपकाळे (30, साकरी फाटा, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही संशयित होमगार्ड आहेत. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.

कुर्‍ह्यातील टोळ्यांचा भुसावळात शिरकाव
दोन दिवसांपूर्वी विरारच्या सराफा व्यावसायीकाला स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने भुसावळात बोलावून त्याच्याकडील साडेतीन लाख लांबवण्यात आले होते. यानंतर थेट दोघा होमगार्ड कुर्‍ह्यातील टोळींची मदत घेत लुटीचा प्रकार केला मात्र तक्रारदारांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर बिंग फुटले व संशयितांना बेड्या पडल्या. कुर्‍हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर परीसरात नागमणी, दुतोंडी मांडूळ, जुने सोन्याचे शिक्के तसेच विविध क्लृप्त्या लढवून नागरीकांना लुटणार्‍या टोळ्या सक्रिय आहेत. भुसावळात सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने झालेल्या लुटीतही कुर्‍हाकाकोडातील चार संशयित असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या टोळ्यांनी आता भुसावळातही पाय पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. पसार चार संशयितांचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !