भुसावळ पालिकेने सात जीर्ण निवासस्थानांवर फिरवला जेसीबी
Bhusawal Municipality moved JCB to seven dilapidated residences भुसावळ : भुसावळ पालिकेने बुधवारी श्री संत गाडगे महाराज रुग्णालयातील सात जीर्ण कर्मचारी निवासस्थानांवर जेसीबी फिरवला असून गुरुवारी वा शुक्रवारी पालिकेची जीर्ण इमारतही पाडण्याचे नियोजन केले आहे. पालिका इमारतीतील व्यापारी गाळ्यांव्यतिरीक्त अन्य पडावू भाग पाडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जीर्ण वसाहत पाडली जात असताना प्रांताधिकारी तथा प्रशासन अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी उपस्थित राहत पाहणी केली.
दोन दिवसात पालिकेची जीर्ण इमारत पाडली जाणार
शहरातील पालिकेच्या आरोग्य विभागाच्या श्री. संत गाडगे महाराज रुग्णालयाच्या मागील बाजूस वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यांची जीर्ण झालेली सुमारे सात निवासस्थाने असल्याने ती पालिकेने बुधवारी नष्ट केली. येत्या दोन दिवसात पालिकेची जुनी जीर्ण इमारत तसेच अन्य भागातील जीर्ण इमारती नष्ट केल्या जाणार आहेत. शहरातील जीर्ण इमारतींच्या मालक, भाडेकरुंनाही नोटीस बजावण्यात आल्या असून त्यानंतरही संबंधित इमारती पाडत नसल्याने पालिकेनेच आता जीर्ण इमारतींबाबत पुढाकार घेतल्याचे प्रशासक जितेंद्र पाटील म्हणाले. दरम्यान, जीर्ण वसाहतीतील घरे पाडली जात असताना भुसावळ पालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, उपमुख्याधिकारी परवेज शेख आदींसह अधिकारी उपस्थित होते.


