साकळी शेत शिवारातून ठिबक नळ्या चोरी करतांना एकाला पकडले
A man was caught stealing drip tubes from a chain farm यावल : यावल तालुक्यातील साकळी शेत-शिवारातून गावातीलच एक तरुण ठिबक नळ्या चोरी करून नेत असतांना शेतकर्यांना आढळून आला. त्याला मुद्देमालासह शेतकर्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयिताविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
संशयिताला रंगेहाथ पकडले
साकळी, ता.यावल येथील दिलीप तुकाराम बडगुजर यांच्या शेत गट क्रमांक 126 मध्ये त्यांनी शेती पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक नळ्या टाकल्या होत्या. त्यांच्या शेतातून योगेश गणेश महाजन (साकळी) याने बुधवारी सायंकाळी पाच हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या तेथून चोरी केल्या व ठिबक नळ्या नेल्या जात असताना हा प्रकार शेतकर्याच्या निर्दशनास आला व त्यांनी योगेश महाजन याला मुद्देमालासह पकडत यावल पोलिसांच्या ताब्यात दिले. यावल पोलिसात दिलीप बडगुजर यांच्या फिर्यादीवरून योगेश महाजन यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.


