भुसावळ शहरात बेकायदा वृक्षतोड : दहा हजारांचा दंड वसुल
अवैधरीत्या वृक्ष तोडणार्यांमध्ये खळबळ : कारवाईचा सपाटा सुरूच राहणार : मुख्याधिकारी
Illegal felling of trees in Bhusawal city : fine of ten thousand भुसावळ : वृक्ष तोड करण्याची परवानगी न घेता बेकायदा चार ते पाच कडूलिंबाची झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार जळगावरोडवरील मोहित नगर भागात घडला होता. या संदर्भात पालिकेला माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी वृक्ष तोड करणार्याकडून दहा हजारांचा दंड वसुल केल्याने शहरातील पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
अनेक वर्षानंतर प्रथमच कारवाई
भुसावळ नगरपरिषद हद्दीतील मोहित नगरातील प्लॉट नंबर 21 सर्वे नंबर 217 मधील रहिवासी अजय बाबुलाल लांडगे यांनी स्वःमालकीच्या जागेवरील अंदाजे चार ते पाच वर्षाच्या कडूलिंबाचे झाड परवानगीविनाच तोडले होते. पालिकेचे मुख्याधिकारी वाघमोडे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी अधिकारी धनराज बाविस्कर यांच्यासोबत थेट घटनास्थळ गाठले. या ठिकाणी वृक्षतोड होत असल्याचे आढळून आल्याने प्लॉटधारक अजय बाबुलाल लांडगे यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नगरपरीषदेचे वृक्ष संवर्धनाच्या निधीत ही दंडाची रक्कम जमा केली जाणार आहे.


वृक्षतोड करणार्या प्लॉटधारक यांना नवीन पाच झाडांचे वृक्षारोपण करून त्याबाबतचे जीपीएस फोटो सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्याने शहरातील वृक्षप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. विनापरवानगी तसेच बेकायदेशीररित्या वृक्षतोड केल्यास कारवाई निश्चित केली जाईल, असे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले.
