किनगावात हजरत मलंगशाह बाबा यांच्या संदल शरीफ मोठ्या उत्साहात
यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे सोमवारी हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल शरीफ मोठ्या उत्साहात झाला. सायंकाळी गावातून निघालेली संदलची मिरवणूक रात्री आठ वाजेला दर्गाहवर पोहोचली व मान्यवरांच्या हस्ते संदल चढवण्यात आला. महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी मुख्य चौकात सर्वधर्मीय बांधवांनी मिरवणुकीचे स्वागत केले.
तडवी वाड्यातून संदलला सुरूवात
किनगाव, ता.यावल येथे सर्वच बांधवांची श्रध्दा असलेल्या हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल सोमवारी मोठ्या उत्साहात सायंकाळी काढण्यात आला. सायंकाळी तडवी वाड्यातून संदल मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. या मिरवणुकीत विविध प्रकारचे वाद्यवृंदासह कला बाजीचे पथक होते. एका सजवलेल्या वाहनात संदल ठेवण्यात आलेे तर मुख्य चौकात संदल मिरवणुकीचे सर्वधर्मीय बांधवांनी स्वागत करीत स्वत: संदलीत सहभाग घेतला. गावातील तडवी वाड्यातून निघालेली ही मिरवणूक कुरेशी वाडा, सोनार गल्ली, शिंपी वाडामार्गे मुख्य चौकात आली. तेथून सुन्नी जामा मशिदीकडून चुंचाळे रस्त्यावरील दरगाहवर मिरवणुकीचा समारोप रात्री आठ वाजता झाला. त्यानंतर श्रद्धापूर्वक बाबांच्या दरगाहवर संदल चढवण्यात आला. या मिरवणुकीत सहभागी हजारो भाविक, भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दर्गाहवर माजी आमदार रमेश चौधरी सह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.


