प्रति जेजुरी खंडेराव देवस्थानात चंपाषष्ठी महोत्सव

सामूहिक मल्हारी याग-सप्तशती पाठ : दर्शणार्थ भाविकांचा जनसागर उसळला


फैजपूर : प्रति जेजुरी फैजपूर तथा महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज यांचा चंपाषष्ठी महोत्सव विविध धार्मिक अनुष्ठानद्वारे मोठ्या धार्मिक उत्सवात साजरा करण्यात आला. सकाळी फैजपूर सराफ परिवारातर्फे खंडेरावास षोडोपचार पूजा, महाअभिषेक करण्यात आला. रावेर, यावल तालुक्यातील स्वामी समर्थ केंद्रातून हजारो सेवेकरी व भाविक सोमवारी सकाळपासूनच प्राचीन जागृत कुलदैवत खंडेराव देवस्थानात दर्शनार्थ दाखल झाल्याने मोठी गर्दी झाली होती.

हजारो भाविकांनी घेतले दर्शन
यावेळी मल्हारी याग, मल्हारी सप्त पाठ, होम-हवन, जप-तप, तळी भरणे, खंडेरावाचा मान सन्मान करीत वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, ठेचा कांदा, मुळा यांचा नैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली. उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सर्व नियोजन खंडेराव देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, उत्तराधिकारी पवनदासजी महाराज, पूजारी राम मनोहरदासजी, कन्हैया महाराज आमोदे यांनी केले. कार्यक्रमाला सतपंथ मंदिर संस्थांचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांची उपस्थिती होती. ते म्हणाले की, खंडेरायाची हजारो महिला पुरुषांनी महिलांनी केलेली उपासना आराधना नक्कीच आपल्याला फळ देईल. श्री खंडेरायाच्या सामूहिक सप्तशती उपासनेचे खूप महत्त्व असून भविष्यात आपल्या परिवारासाठी तसेच देशासाठी फलदायी असेल. या कार्यक्रमाला स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी तसेच परिसरातील हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती दिली. खंडेराव देवस्थान कार्यकर्ते तथा श्री स्वामी समर्थ केंद्रातील कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !