नऊ वाहनांपैकी सहा जणांनी भरला दंड : तीन वाहनांचा लिलाव
यावलला अवैध गौण खनिज वाहनांच्या लिलावातून 19.6 लाख वसूल
यावल : यावल तहसील कार्यालयात अवैध गौण खनिज वाहतूक करतांना पकडण्यात आलेल्या वाहन मालकांना दंडाची नोटीस देऊनही त्यांनी दंड न भरल्याने एकूण 9 वाहनांचा लिलाव तहसीलदारांनी जाहीर केला होता. त्यापैकी लिलाव प्रक्रिया पूर्वीच सहा वाहनधारकांनी आपापला दंड भरला तर तीन वाहनाचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेत नऊ वाहनधारकांकडून 19 लाख सहा हजार 390 रुपयांचा महसुल प्रशासनास प्राप्त झाला.
लिलावापूर्वीच सहा वाहनधारकांनी भरला दंड
यावल तहसील कार्यालयात महसूलच्या गस्तीपथकाकडून पकडण्यात आलेल्या अवैद्य गौण खनिज वाहतुकीच्या विविध वाहन मालकांना दंडाच्या संदर्भात नोटीस देण्यात आली मात्र अनेकांनी दंड भरला नाही. दंड न भरलेल्या 9 वाहनांचा लिलाव तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जाहीर केला. यावल तहसील कार्यालयात मंगळवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेमध्ये 19 जणांनी सहभाग घेतला. लिलाव प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच लिलाव जाहीर झालेल्या नऊ वाहनधारकांपैकी सहा वाहन मालकांनी दंड अदा केला. सहा वाहनधारकांकडून 10 लाख एक हजार 390 रुपये दंड वसूल झाला तर उर्वरीत तीन वाहनांचा लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रियेतून एक डंपर आणि दोन ट्रॅक्टरचा लिलाव करीत नऊ लाख पाच हजार रुपये वसूल झाले. एकूण 19 लाख सहा हजार 390 रुपयांचा महसुल प्रशासनास प्राप्त झाला. ही प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, सुयोग पाटील, भाग्यश्री इंगळे, लियाकत तडवी, युनूस खान यांच्या वतीने पार पाडण्यात आली.


