यावल शहरात पदवी नसतांना वैद्यकीय व्यवसाय : ‘मुन्नाभाई’ डॉक्टराला पडल्या बेड्या


Medical profession without a degree in Yaval city : ‘Munnabhai’ doctor shackled यावल : यावल शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात वैद्यकीय पदवी नसतांना वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या बोगस डॉक्टराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. बोगस डॉक्टर संदर्भातील गोपनीय माहिती बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधणार्‍या समितीला मिळाली होती व या समितीने त्या ठिकाणी पंचांसह जाऊन तपासणी केली आणि संबंधिताला पोलिसांच्या स्वाधीन केले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल शहरात अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गाला लागून भुसावळ टी पॉइंट जवळ नगरपालिकेचे व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलाच्या एका गाळ्यात कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतांना डॉ.बिजन नीमचंद रॉय (धनगरवाडा, यावल) हा बंगाली डॉक्टर अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची तालुकास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसाय शोधणार्‍या समितीला मिळाली होती. समिती सदस्य तथा तालुका आरोग्य अधिकारी राजू याकुब तडवी, आरोग्य विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, शकील तडवी, अमीत तडवी, पंच डॉ. सतीष अस्वार, डॉ.धीरज पाटील यांच्यासोबत पोलिसांची मदत घेऊन या डॉक्टराकडे छापा टाकल्यानंतर तेथे डॉ.बिजन रॉय हा आपल्याकडे कुठल्याही प्रकारची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची प्रमाणपत्र व इतर काही पदवी नसतांना बोगस पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. संशयिताकडे अ‍ॅलोपॅथी, अँटिबायोटिक्स सह विविध प्रकारचे औषधी मिळून आली. या ठिकाणी दहिगाव येथील एक रुग्ण देखील उपचारासाठी आला होता.



अनिधकृत औषध साठाही सापडला
मागील दोन दिवसापासून तो मुळव्याधवर या ठिकाणी उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या डॉक्टरकडे विविध प्रकारचे वैद्यकीय औषधे देखील अनधिकृत पणे मिळून आली. संबंधित डॉक्टरविरुद्ध यावल पोलिसात यावल तालुका आरोग्य अधिकारी राजू तडवी यांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय वैद्यक व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !