पीओएचमधील आठ लाखांचे चोरी प्रकरण : आरपीएफ हवालदाराला 26 पर्यंत कोठडी
आणखी एका आरपीएफ कर्मचार्यावर कारवाईचे संकेत : रेल्वे महाव्यवस्थापकांकडून कसून चौकशीचे आदेश
8 lakh theft case in POH: RPF constable jailed till 26 भुसावळ : रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांची महागडी पॉवर केबल चोरी प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदारासह चौघांना अटक करण्यात आली होती. संशयिताची कोठडी संपल्याने रविवारी न्यायालयात हजर केले असता हवालदार वगळता अन्य तिघांना न्यायालयीन कोठडी तर हवालदाराला 26 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे चोरी प्रकरण
भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून सात लाख 94 हजार 227 रुपये किंमतीची 1604 किलो पॉवर केबल चोरीला गेल्याचा प्रकार 15 ते 16 डिसेंबरदरम्यान उघडकीस आला होता. आरपीएफ हवालदार शशिकांत सुरवाडे याने केबल विक्रीतील निम्मे रक्कम स्वतःच ठेवल्याने त्यास गुन्ह्यात आरोपी करून अटक करण्यात आली तर संशयित कुणाल लक्ष्मण मोरे (19, महादेव मंदिराजवळ, कंडारी, ता.भुसावळ), सचिन उत्तम तायडे (25, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) व राहुल रतन मोरे (23, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. संशयिताची कोठडी 24 रोजी संपल्याने रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्या.साळुंखे यांनी हवालदार सुरवाडे यास 26 पर्यंत आरपीएफ कोठडी तर अन्य तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. वरीष्ठ सरकारी अभियोक्ता अॅड.अजयकुमार सिंग यांनी रेल्वे सुरक्षा बलाची बाजू मांडली. दरम्यान, चोरीच्या प्रकरणात अन्य एका आरपीएफ कर्मचार्यावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.


