रावेरात एकाचवेळी चार ठिकाणी घरफोड्या ; तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

वाढत्या चोर्‍यांनी रहिवासी धास्तावले : एक 34 हजारांचा ऐवज लांबवला ; लाईट नसलेल्या भागात चोरट्यांचे काम फत्ते


Burglary at four places simultaneously in Raver ; Attempted theft at three locations रावेर : रावेर शहरातील विविध भागात एकाचवेळी चार ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या तर तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. घरफोड्यांची माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष अडसुळ यांनी पाहणी केली. दरम्यान, एक लाख 34 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला असून याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोड्यांनी रहिवासी धास्तावले
रावेर शहरात वेगवेगळ्या भागात चार ठिकाणी घरफोड्या झाल्या तर तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. सर्व घटना रावेर शहरात रात्री लाईट नसतांना घडल्या. सौभाग्य नगरातील रहिवासी प्रशांत पाटील कामानिमित्त नाशिक गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटातून 21 ग्रॅम सोन्याचे दागिने तर 17 भार चांदी तर 27 हजार रोख लांबवले. याच भागातील अशोक प्रेमसिंग पाटील हे त्यांच्या मूळ गावी पाचोरा गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 45 हजार रोख लांबवले. घरमालक प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तिसरी घटना जीआय कॉलनी येथे घडली. अटकाळे यांचेदेखील बंद घर फोडण्यात आले. त्या बाहेरगावी असल्याने त्यांच्याकडे किती रुपयांचा ऐवज गेला अद्याप कळू शकले नाही. अचानक घडलेल्या या घरफोड्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



धान्य दुकानातून बारा हजारचे धान्य लंपास
चौथ्या घटनेत रावेर शहरातील स्वस्त धान्य दुकान फोडून चोरट्यांनी 12 हजार रुपये किंमतीचे गहू आणि तांदळाचे कट्टे चोरुन नेले. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. रावेर येथील स्टेशन रस्त्यावरील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाचे दरवाजाचा कडीकोंडा रविवारी रात्री चोरट्यांनी तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील पाच हजार रुपये किंमतीचे पाच गव्हाचे कट्टे (पोते), सात हजार दोनशे रुपये किंमतीचे सहा तांदळाचे कट्टे चोरुन नेण्यात आले. याप्रकरणी सतीश धनराज पवार आणि गोपाल उर्फ कृष्णा महाजन पवार (भोर स्टेशन) यांना अटक करण्यात आली. याबाबत लक्ष्मण निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !