सावखेड्यात चार महिन्यांचे स्त्री जातीचे मृत अर्भक टाकून मातेचे पलायन
Escape of the mother after leaving the dead four-month-old female infant in Savakheda यावल : स्त्री जातीच्या तीन ते चार महिने वयाच्या गर्भपात केलेल्या मृत अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील सावखेडासीम येथे उघडकीस आली. अज्ञात मातेने स्त्री जातीचे अर्भक गटारीत टाकल्याची माहिती पोलिस पाटलाने यावल पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी अर्भकास ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी जळगावी पाठविले.
दोन महिन्यातील दुसरी घटना
सावखेडासीम, तालुका यावल या गावात सोमवार, 25 रोजी गावातील गटारीत तीन ते चार महिने वयाचे मृत स्त्री जातीचे गर्भपात केलेल्या अवस्थेत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. गटार स्वच्छ करताना हा प्रकार समोर आला. गावातील पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी याबाबत यावल पोलिसांना माहिती कळवली.


अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याने व तो लपवण्याच्या उद्देशाने हे अर्भक फेकण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मृत अर्भक आढळल्यानंतर त्यास पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या सूचनेनंतर सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व हवालदार राजेंद्र पवार यांनी सावखेडासीम येथे घटनास्थळी भेट देत मृत अर्भकाला ताब्यात घेत पंचनामा केला. अशा प्रकारे मृत अर्भक फेकुन दिल्याची दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. यामुळे परीसरात चर्चेला उधाण आले आहे.
