पीओएचमधील आठ लाखांचे चोरी प्रकरण : भुसावळातील आरपीएफच्या दोन कर्मचार्यांना अटक
कुंपणानेच खाल्ले शेत : दोन संशयितांना 30 पर्यंत तर अन्य चौघांची कारागृहात रवानगी
Eight lakh theft case in POH : Two RPF personnel arrested in Bhusawal भुसावळ : रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांची महागडी पॉवर केबल चोरी प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदारासह अन्य तिघांना अटक करण्यात आली होती तर या प्रकरणात आता अन्य दोन कर्मचार्यांचा सहभाग आढळल्याने त्यांनाही अटक करण्यात आल्याने अटकेतील संशयितांची संख्या सहावर पोहोचली आहे. एएसआय सुनील टोकदार व कॉन्स्टेबल अश्विनी यादव अशी अटकेतील संशयिताची नावे असून त्यांना 30 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली. रेल्वेच्या चोरी प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांनी चोरीला प्रोत्साहन दिल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत.
असे आहे चोरी प्रकरण
भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून सात लाख 94 हजार 227 रुपये किंमतीची 1604 किलो पॉवर केबल चोरीला गेल्याचा प्रकार 15 ते 16 डिसेंबरदरम्यान उघडकीस आला होता. याप्रकरणी संशयित सचिन उत्तम तायडे (25, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ), राहुल रतन मोरे (23, महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी, ता.भुसावळ) व कुणाल लक्ष्मण मोरे (19, महादेव मंदिराजवळ, कंडारी, ता.भुसावळ)आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (57, स्वामी विहार, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. सुरूवातीला चारही संशयितांना 24 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली तर सुरवाडे व्यतिरीक्त तिघा संशयिताना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर सुरवाडे यांना दोन दिवसांची वाढीव आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली. कोठडीची मुदत संपल्यानंतर 26 रोजी सुरवाडे यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


पुन्हा दोन कर्मचार्यांना अटक
रेल्वेच्या चोरी प्रकरणात तपास सुरू असताना या प्रकरणी दोषी आढळलेल्या एएसआय सुनील टोकदार व कॉन्स्टेबल अश्विनी यादव यांना मंगळवार, 26 रोजी अटक करण्यात आली. संशयिताना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 30 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात सुनावण्यात आली. वरीष्ठ सरकारी अभियोक्ता अॅड.अजयकुमार सिंग यांनी रेल्वे सुरक्षा बलाची बाजू मांडली.
