अवैध वाळू वाहतूकदाराची मुजोरी : महिला मंडळाधिकार्यासह पथकाला चिरडण्याचा प्रयत्न
Illegal sand transporter’s mujori : Attempt to crush a team with a woman board member भुसावळ : अवैध वाळू वाहतूक करणार्या डंपरने महसूल पथकाच्या वाहनाला धडक कर्मचार्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना 11 रात्री 11 वाजेच्या सुमारास फुलगाव शिवारात घडली. याप्रकरणी डंपर व मोटार सायकल चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू वाहतूकदारांची मुजोरी थांबेना
जळगावकडून भुसावळकडे येत असताना पिवळ्या रंगाचे डंपर (एम.एच.19 झेड.4669) तपासणी कामी थांबवले असता वाहन चालकाने वाहन न थांबवता वाहन पळून नेण्याचा प्रयत्न केला, साकेगाववरून बोहर्डी फाटा ब्रीजखाली वळवून पुन्हा जळगावच्या दिशेने वळवून डंपर जळगाव तालुक्यातील कडगावपर्यंत जवळपास 50 किलोमीटरचा पाठलाग करून वरणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने वाहन पकडण्यात यश आले. यावेळी वाहन चालकाने कडगाव शिवारातील दादरच्या शेतात उभ्या पिकात 14 हजार रुपये किंमतीची वाळू खाली करीत डंपर घालून अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडून पळ काढला. दुसर्या वाहन चालकाची मदत घेऊन डंपर वाहन पथकाने ताब्यात घेऊन जप्त केले. डंपर वरील चालकाने कडगाव येथील शेतकर्याच्या दादरच्या शेतीत डंपर घालून पिकाचे नुकसान ेकेल्याने हा शेतकरी सुध्दा चालकाविरूध्द वेगळी फिर्याद देणार आहे.


महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न
महसूल कर्मचारी वाहन थांबवित असताना महसूल पथकातील कर्मचारी यांच्या अंगावरती डंपर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तर तहसीलदारांच्या पथकारातील वॅगन आर वाहनाला धडक देवून पाच हजारांचे नुकसान करण्यात आले. मंडळाधिकारी रजनी तायडे, चालक फिरोज खान सिकंदर खान, वराडसीम तलाठी नितीन केले, कठोरा तलाठी मिलिंद तायडे, साकेगाव कोतवाल जितेश चौधरी यांच्यावर अंगावर संशयिताने डंपर आणून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वरणगाव मंडळाधिकारी रजनी तायडे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी डंपर चालक एम.एच,19 झेड.4679 व अनोळखी मोटरसायकल (एम.एच.19 डी.डब्ल्यू.5950) वरील चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
थेट गुन्हे दाखल होणार
अवैध वाळू वाहतूक करणार्यां वाहन चालक व मालक याच्या विरूध्द कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अवैध गौण खनिज वाहतूक कायद्याअंतर्गत दंडाची कारवाईकरून गुन्हे दाखल केले जातील, असे तहसीलदार निता लबडे यांनी सांगितले.
