भुसावळात जुन्या वादातून अंडापाव विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला : त्रिकूटाविरोधात गुन्हा
Assault on an egg seller due to an old dispute in Bhusawal : Crime against the trio भुसावळ : भुसावळ शहरातील खडका रोडवरील हिरा हॉलजवळ शनिवार, 13 या दिवशी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या वादातून अंडापाव विक्रेता अजीम शेख (35) याच्यावर चाकू व लोखंडी रॉड मारून प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी हॉस्पीटलला उपचार सुरू आहे. याप्रकरणी तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या वादातून हल्ला
अजीम शेख हा तरुण अंडापाव विक्री करून उदरनिर्वाह करतो. शुक्रवार, 12 रोजी त्याचा लहान भाऊ रईसोद्दीन शेख व मित्र शाहरूख खाटीक व आरोपीचा भाऊ यांच्या कुठल्यातरी कारणावरून वाद झाले होते व या वादाचा वचपा काढण्यासाठी खडका रोडवरील हिरा हॉलजवळ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अजीम शेख येताच त्रिघांनी त्याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॅाडचा उपयोग करीत अजीमला मारहाण करण्यात आली तसेच चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात अजीम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.


त्रिकूटाविरोधात गुन्हा : पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड व डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अजीम खान याच्या फिर्यादीवरून काफील खान उर्फ बंटी शकील खान (36), रेहान शकील खान (20) व शादाब खान उर्फ गोलू (26, अवलीया मशिदीजवळ, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी काफील खान व शादाब खान यास अटक केली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहेत.
