शहाद्यातील डॉक्टराला पिस्तुलाच्या धाकावर मागितली सहा लाखांची खंडणी
शिताफीने डॉक्टरांनी केली सुटका ; मुख्य संशयीत पसार तर अन्य दोन संशयीतांना अटक
अमळनेर : सहा लाखांसाठी शहरातील डॉक्टरांचे अपहरण करून त्यांना पिस्तुल लावणर्या दोघांना अटक करण्यात आली असून अन्य दोघे पसार झाले आहेत. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शहादा येथील विजय गोसावी हे गावोगावी फिरून आयुर्वेदिक दंतमंजन विक्री, दात सफाईचे, दात कवडी बसवण्याचे काम करतात. आठ दिवसांपूर्वी अंजली पटेल नावाच्या महिलेने मोबाइलवर संपर्क साधून वडिलांचे दात बसवण्यासाठी घरी बोलावले. त्यानुसार गोसावी व त्यांच्या मावशीचा मुलगा तुषार जलालगीर गोसावी अमळनेर येथे आल्यानंतर त्यांनी पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांनी विद्याविहार कॉलनीमधील एका घरी नेत डांबून ठेवण्यात आले. चौघांनी आम्ही पोलिस असल्याचे सांगत मारहाण केली तसेच पिस्तूल लावून सहा लाखांची खंडणी मागितली. यावेळी गावात राहणार्या बहिणीकडून पैसे देतो, असे सांगितल्यानंतर संशयीतांनी धुळ्याला जायचे सांगून बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांनी कशीबशी सुटका करीत पोलिस ठाणे गाठले.
दोघा संशयीतांना अटक
गोसावी यांच्या तक्रारीवरून अरविंद रवींद्र बिर्हाडे (वय 20) व महेंद्र सीताराम मोरे (वय 40) यांना विद्याविहार कॉलनीतून रात्री 10 वाजता ताब्यात घेतले. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्या. ए.जे. वळवी यांनी दोघांना 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, मुंबई गोरेगाव चेकनाका येथील गोकूळ निंबाजी गाडगे (वय 32) व त्याचा मावसभाऊ विनोद हे फरार असून ते मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.