महाविकास आघाडीचा ‘शेतकरी’ हाच प्रमुख केंद्रबिंदू


मुक्ताईनगरात शेतकरी मेळाव्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : वढोदा व्याघ्र प्रकल्प पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्याची ग्वाही

मुक्ताईनगर : बेरोजगारी, शेतकरी, महाराष्ट्राचा विकास करणे या मुद्यावरून महाविकास आघाडी एकत्र आली असून शेतकरी हाच प्रमुख केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुक्ताईनगरात शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याप्रसंगी वढोदा व्याघ्र प्रकल्प पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी देत जनतेच्या हिताचे जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही, असेही वचन दिले.

एकाच बैठकीत दाखवला विश्‍वास
मुख्यमंत्री म्हणाले की, आव्हान देणार्‍या शिवसेना प्रमुखांचा मी पूत्र असून 25 ते 30 वर्ष ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी कधीही आपल्यावर विश्‍वास दाखवला नाही मात्र ज्यांच्यासेाबत आपण राजकीय संघर्ष केला त्यांनी एकाच बैठकीत आपल्यावर विश्‍वास दाखवला, असे सांगत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, तीन पक्ष एकत्र आल्यानंतर आमच्यावर टिकाही झाली, कसे चालणार हे सरकार मात्र शेतकरी कर्जमुक्त व्हायला हवा, त्यांना घामाचा दाम मिळावा ही संकल्पना आमची होती शेतकरी हाच प्रमुख केंद्रबिंदू असल्याने सरकार स्थापन झाले, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला होता व दोन लाखांपर्यंत कर्जमुक्त केले असे सांगून नेहमीच कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुक्ताईनगरात आमदार पाटलांचा विजय झाल्याचा धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री खडसेंचे नाव न घेता जनतेने मुक्ताईनगराला मुक्त केल्याचा टोलाही त्यांनी लगावल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.



व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी
मुख्यमंत्री यांनी भाषणात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी केलेल्या वढोदा-डोलारखेडा व्याघ्रप्रकल्पाला प्रथम मंजुरी दिल्याची घोषणा करीत तो आपला आवडता प्रकल्प असल्याचे सांगत प्रकल्पात मात्र वाघ दाखवावेत, असेही ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे खमके मार्गदर्शक असून त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचेही त्यांनी नम्रपणे नमूद केले. आमदार पाटील यांनी सूचवलेले प्रश्‍न सोडवण्याची ग्वाहीदेखील त्यांनी प्रसंगी दिली.

तर आता पाडा सरकार : मुख्यमंत्र्यांचे खुले आव्हान !
हे सरकार चालणार नाही, अशी टिका भाजपाकडून होत असल्याचा धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही आज येथे एकत्र असून यापुढे राहणार असून त्यांनी सरकार पाडून दाखवावेच, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

बोदवडमधील पाणीप्रश्‍न सोडवणार -पालकमंत्री
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगराचा इतिहास बदलला असून मागच्या काळात जिल्ह्यावर अन्याय झाला. विशेषतः माझ्यावर गुलाबरावांवर मुक्ताईनगराकडून अन्याय झाला, अशी टिका त्यांनी माजी मंत्री खडसेंचे नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी मेळाव्यात केली. भगवान के घर देर है अंधेर नही, असा खोचक टोलाही त्यांनी हाणला. जिसके हात में दंडा उसकी भैंस आता हे चालणार नाही, असे त्यांनी बजावले. आता आपले सरकार असून महाविकास आघाडीने शेतकर्‍यांना सरळ कर्जमाफी दिल्याचे ते म्हणाले. बोदवड तालुक्याच्या पाण्याची योजना मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

केळीसह बेरोजगारीचा प्रश्‍न सोडवा -आमदार चंद्रकांत पाटील
बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष असून अनेक नेत्यांनी मोठ-मोठी पदे भूषवली मात्र पाण्याचा प्रश्‍न सुटला नसल्याची टिका आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री खडसे यांचे नाव न घेता केली. 2009 पासून प्रलंबित असलेला घरकुलांचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणीही त्यांनी शेतकरी मेळाव्यात केली. भारतातील केळी उत्पादनाच्या 15 टक्के खान्देशातील उत्पादन होत असल्याने केळीला हमी भाव द्यावा तसेच तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सोडवण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री दिलीप वळसे पाटील, जळगावचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आयोजक तथा आमदार चंद्रकांत पाटील, रावेरचे आमदार शिरीष चौधरी, पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !