जळके गावातील वयोवृद्ध भरधाव डंपरच्या धडकेने ठार
Elderly Bhardhav of Jalke village was killed by a dumper जळगाव : विनाक्रमांकाच्या डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे जळगाव तालुक्यातील जळके येथील कमलाकर मोतीराम पाटील (64, रा.जळके, ता. जळगाव) हे वयोवृद्ध ठार झाले. हा अपघात रविवारी पळासखेडा मिराचे गावाजवळ घडला. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला व काही वेळानंतर घटनास्थळावरून डंपरही पळवून नेण्यात आले.
दशक्रिया विधीला जाताना अपघात
जळगाव तालुक्यातील जळके येथील रहिवासी असलेले कमलाकर पाटील यांचे गावातच किराणा दुकान आहे. रविवार, 28 जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता त्यांच्या नातेवाईकांकडे दशक्रिया विधी असल्याने ते जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे दुचाकीने (क्र.एम.एच.19, डी.एन.7914) जात होते. पळासखेडा मिराचे गावाच्या थोडे पुढे गेल्यानंतर शाळेजवळ समोरून येणार्या विना क्रमांकाच्या भरधाव वाळूच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कमलाकर पाटील हे ठार झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.


अवैध वाळू वाहतूक थांबणार कधी ?
अपघातानंतर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ तसेच नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. शवविच्छेदनानंतर दुपारी मयत पाटील यांच्यावर जळके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई असा परिवार आहे. दरम्यान, दुसरीकडे जिल्ह्यात वाळू उपसा बंद असला तरी अनेक ठिकाणी वाळूची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे अनेक घटनांवरून वारंवार समोर येत आहे. त्यात रविवारीदेखील विनाक्रमांकाच्या डंपरमधून वाळू वाहतूक सुरू असताना या वाहनाने एका जणाचा जीव घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
