जळगावात हद्दपार आरोपीची तलवारीच्या धाकावर दहशत
जळगाव : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करीत जळगावात आलेल्या आरोपीने तलवार बाळगून दहशत निर्माण केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलिसात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (26, सुप्रीम कॉलनी) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.
तलवारीच्या धाकावर दहशत
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुप्रीम कॉलनीतील दिनकर उर्फ पिण्या चव्हाण याला जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. संशयिताने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करीत सुप्रीम कॉलनी परीसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.


संशयिताची कारागृहात रवानगी
त्यानुसार हिरे यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, सचिन पाटील, विशाल कोळी, सतीश गरजे, मंदार पाटील अशा पथकाने सुप्रीम कॉलनीत जाऊन कारवाई करत गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या चव्हाण याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली. संशयिताविरोधात आतापर्यंत वेगवेगळे 22 गुन्हे दाखल करण्यात आलेले असल्याचे समोर आले आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती श्रीमती जे.एस.केळकर यांनी कारागृहात रवानगीचे आदेश दिले.
