जामनेरसह अमळनेरातील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध : जळगाव जिल्हाधिकार्यांचे आदेश
Jamner and Amalnera inn criminals stationed : Jalgaon Collector’s orders जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या अमळनेरसह जामनेरातील गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतेच काढले. रमण उर्फ माकू बापू नामदास (22, मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर) आणि योगेश उर्फ भुर्या वसंत चव्हाण (32, रा.बजरंगपुरा, जामनेर) अशी स्थानबद्ध गुन्हेगारांची नावे आहेत.
अमळनेरच्या गुन्हेगाराविरोधात चार गुन्हे
अमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रमण उर्फ माकू बापू नामदास याच्याविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर 2 प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली. जबरी लूट तसेच चोरीप्रकरणी गुन्हे दाखल असल्याने अमळनेरचे तत्कालीन निरीक्षक विजय शिंदे यांनी एमपीडीएचा प्रस्ताव सादर केला होता.


जामनेरच्या गुन्हेगारावर सहा गुन्हे
जामनेर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हेगार योगेश उर्फ भुर्या वसंत चव्हाण याच्याविरोधात जामनेर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे सहा गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा झाली नाही. जामनेर पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी एमपीडीचा प्रस्ताव जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात पाठविला. प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव रवाना झाले. सोमवार, 29 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोन्ही गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई केली.
दोघांची कारागृहात रवानगी
गुन्हेगार रमण उर्फ माकू बापू नामदास याला ताब्यात घेऊन कोल्हापूर कारागृहत स्थानबद्ध करण्यात आले तर जामनेर येथील गुन्हेगार योगेश उर्फ भुर्या वसंत चव्हाण याला ठाणे जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याचे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.
