व्यावसायीकाला मारहाण करीत कार लांबवली : पाचोरा तालुक्यातील घटना
A businessman was beaten up and car was stolen: incident in Pachora taluka पाचोरा : पाचोरा तालुक्यात व्यावसायीकाला मारहाण करुन कार पळवून नेल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अन्य दोन घटनांमध्ये चाळीसगावात घरासमोरुन कार लांबवण्यात आली तर जळगाव शहरात खासगी हॉस्पिटलसमोरुन चोरट्यांनी दुचाकी लांबवली.
मारहाण करीत लांबवली कार
अरुण बाबूलाल जाधव हे भोजे, ता.पाचोरा येथील रहिवासी असून ते बांधकाम व्यावसासीक आहेत. ते कामानिमित्त त्यांच्या मालकीची कार (क्रमांक एम.एच.19 ई.ए.3494) ने जळगाव येथे गेले. काम आटोपून सायंकाळी ते भोज गावी जाण्यासाठी कारने निघाले. पाचोरा तालुक्यातील साजगाव शिवारातून रस्त्याने त्यांची कार धावत असताना पल्सर तसेच प्लॅटीना अशा दोन दुचाकीने चौघे अनोळखी आले. त्यांनी कारपुढे दुचाकी आडवी करत कार थांबविली. अरुण जाधव यांना कारमधून त्यांनी बाहेर ओढले. त्यांना शिविगाळ करत चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर कार घेवून चोरटे पळाले. हा थरार 31 रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला. सहा लाख किंमतीची कार, 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप तसेच 10 हजार किंमतीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरट्यांनी जबरीने लुटून नेला. सोमवार, 5 रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार सचिन निकम करत आहेत.


घरासमोरुन पळविली कार
चाळीसगाव शहरात खरजाई नाका जगन आप्पा टॉवर परिसरात रविवार, 4 रोजी संध्याकाळी क्रमांक (एम.एच.19 सी.एफ. 3888) ही कार घरासमोर पार्क केली होती. रात्री चोरट्यांनी कार लांबवली. सोमवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कार चालक दीपक सुखदेव पगार (रा.चाळीसगाव) यांनी तक्रार दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाच लाख रुपये किंमतीची कार चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार राहुल सोनवणे करत आहेत.
हॉस्पिटलसमोरुन दुचाकीची चोरी
निवृत्ती गजानन सोनवणे (32) हे वाकटुकी, ता.धरणगाव येथे वास्तव्यास आहेत. शेती करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जळगाव येथे उपचारासाठी नातेवाईक दाखल झाल्याने ते गुरुवार, 1 रोजी रात्री 9.30 वाजता त्यांच्या मालकीची क्रमांक (एम.एच.19 डी.एन.2272) ने खडके हॉस्पिटल येथे आले. दुचाकी लॉक करुन ते खडके हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. त्यानंतर चोरट्याने लॉक तोडत दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार शनिवार, 3 रोजी उघडकीस आला. या प्रकरणी सोमवार, 5 रोजी गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला. तपास हवालदार महेंद्र पाटील हे करत आहेत.
