चाळीसगाव गोळीबाराने हादरले : माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर गोळीबार
Chalisgaon shaken by firing : Firing on former corporator Balu More चाळीसगाव : चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक महेंद्र (बाळू) मोरे यांच्यावर पांढर्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचा प्रकार बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजेदरम्यान घडला. गोळीबारानंतर हल्लेखोर कारने पसार झाले असून त्यांच्या अटकेसाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे दाखल झाले आहेत.
कार्यालयात केला गोळीबार
चाळीसगावचे माजी नगरसेवक बाळू मोरे हे हनुमान वाडी भागातील कार्यालयात बसलेले असताना पांढर्या रंगाच्या कारमधून अज्ञात पाच हल्लेखोर उतरले. हातात कट्टे घेवून उतरलेल्या हल्लेखोरांनी मोरे यांच्या कार्यालयात जात त्यांच्यावर अंदाधूंद तीन ते चार गोळ्या झाडल्या व लागलीच हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोरांनी आपली ओळख पटू नये यासाठी रूमालाने पूर्णपणे चेहरे झाकले होते. या हल्ल्यात मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


जिल्हाभरात नाकाबंदी
गोळीबाराची घटना बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार ते पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून नाकाबंदी लावण्यात आली आहे. हल्ल्यामागील स्पष्ट कारण अद्याप समोरे आलेले नाही.
