भरधाव डंपरच्या धडकेने जळगावातील सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू
A retired teacher in Jalgaon died after being hit by a speeding dumper जळगव : भरधाव वेगातील डंपरने महामार्गालत सर्व्हीस रोड ओलांडत असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाला धडक दिली. या अपघातात पुंडलिक भिका पाटील (75, शिवराणानगर) यांचा मृत्यू झाला. मंगळवार, 13 रोजी सकाळी 7.30 वाजता ही घटना गुजराल पेट्रोलपंपासमोर घडली. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे.
सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघाती मृत्यू
पुंडलिक पाटील हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी घरुन निघाले. सर्व्हीस रोडला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी चहा घेतला. ओव्हरबिज खाली भीक मागणार्या लोक दिसल्याने त्यांच्यासाठी त्यांनी चहा घेतला. हा चहा हातात घेवून ते त्या बसलेल्या लोकांना चहा देण्यास निघाले. सर्व्हीस रोड क्रॉस करुन ते गुजराल पंपा समोर ब्रिजच्या बोगद्याकडे जात होते. त्याचवेळी मानराज पार्ककडून डंपर (एम.एच.19 बी.एम.) ने खोटेनगरकडे जात असताना त्यांना धडक दिली. यात ते जागेवर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होवून ते बेशुध्द झाले.


डंपर चालकाविरोधात गुन्हा : वाहन जप्त
अपघाताची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलिसांनी जखमी पुंडलिक पाटील यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ उटगे यांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. दरम्यान पोलिसांनी हा डंपर ताब्यात घेतला. हायवेच्या दुरुस्तीच्या कामासाठी या डंपरचा डांबर वाहून नेण्याच्या कामासाठी उपयोग केला जातो. मात्र हे डंपर रीकामे धावत होते. या अपघात प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील हे करीत आहेत. मृत सेवनिवृत्त शिक्षकामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. घटना कळताच कुटुंबियांना जबर धक्का बसला.
