पुण्यातील मे.नंदन असोसिएटसचे श्यामकांत कोतकर व भागीदारांविरुद्ध चाळीसगावात खटला

तीन कोटी 82 लाख रुपयांचे फसवणूक प्रकरण : चाळीसगाव न्यायालयात 4 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश


Chalisgaon case against Shyamkant Kotkar and partners of M. Nandan Associates in Pune चाळीसगाव : मेसर्स नंदन असोसिएटसचे भागीदार शामकांत केशव कोतकर, भागीदार ज्योती शामकांत कोतकर (दोघे रा.पुणे) यांच्याविरुद्ध इंडियन निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अ‍ॅक्टचे कलम 138 प्रमाणे दाखल झालेल्या चाळीसगाव न्यायालयातील खटल्यात न्यायालयाने प्रोसेस इश्यू करून दिनांक 4 मार्च 2024 रोजी चाळीसगाव न्यायालयात हजर राहण्याबाबतचा आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सादर केला अहवाल
चाळीसगाव येथील पार्क रीटेल मार्केटिंग प्रा.लि.चे संचालक राहुल दिनेशकुमार पटेल, संचालक प्रशांत प्रवीणभाई पटेल, संचालक आशिषभाई प्रवीणभाई पटेल व संचालक केयूर दिनेशभाई पटेल यांनी पुणे येथील मेसर्स नंदन असोसिएट्सचे भागीदार शामकांत केशव कोतकर, भागीदार ज्योती शामकांत कोतकर यांच्याविरुद्ध चाळीसगाव येथील न्यायालयात इंडियन निगोशिएबल इन्स्टूमेंट अ‍ॅक्ट कलम 138 प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला होता. याबाबत न्यायालयाने क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 202 प्रमाणे या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश चाळीसगाव पोलीस निरीक्षक यांना दिले होते. त्यानुसार संबंधित पोलीस स्टेशनने चौकशी करून याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल न्यायालयात सादर केला. दाखल झालेला अहवाल, फिर्यादीतील मजकुराचे निरीक्षण व सोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करून न्यायालयाने आरोपी यांच्या विरोधात इंडियन निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अ‍ॅक्ट कलम 138 प्रमाणे प्रोसेस इश्यूचा आदेश जारी केला आहे.



विश्वास संपादन करून पैश्याची मागणी
चाळीसगाव न्यायालयात फिर्यादी यांच्या वतीने दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी भागीदार व आरोपी भागीदार यांचे पूर्वीपासून घरगुती व ओळख परिचयाचे चांगले संबंध होते. त्या माध्यमातून आरोपीस सन 2014 मध्ये उद्योग व्यवसायाकरीता आर्थिक अडचण असल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या चाळीसगाव येथील प्रभात गल्लीतील कार्यालयात येऊन फिर्यादी यांना भेटून सांगितले की, आमची फर्म मेसर्स नंदन असोसिएटस ही पुणे येथे एक प्रोजेक्ट करत आहे. त्यात एक प्रॉपर्टी विकत घेऊन ती विकसीत करायची आणि त्यानंतर ती विक्री करून त्यातून मिळणार्‍या नफ्यामधून गुंतवणुकीनुसार आपला समभाग घ्यावयाचा आहे. त्याकरीता आपण त्यात सहभागी व्हा. त्यापासून तुम्हाला निश्चितच फायदा होईल. असे आरोपींनी फिर्यादीला सांगू आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या फर्मला इन्व्हेस्टर आणि डेव्हलपर म्हणून दोन कोटी 25 लाख रुपयांची मागणी केली. प्रोजेक्टच्या मिळणार्‍या नफ्यावर तसेच फिर्यादीने आरोपी यांना दिलेल्या रकमेवर 12 टक्के प्रमाणे व्याज हे दोन वर्षानंतर फिर्यादीस दिले जाईल, असे ठरले होते. त्यानंतर फिर्यादी भागीदारांनी या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची संमती दिली.

मे.नंदन असोसिएट्सच्या खात्यावर पैसे ट्रान्सपर
पार्क रिटेल मार्केटिंग प्रा.लि.चे संचालक राहुल दिनेशकुमार पटेल, प्रशांत प्रवीणभाई पटेल, आशिषभाई प्रवीणभाई पटेल व केयूर दिनेशभाई पटेल यांनी प्रत्येकी 56 लाख 25 हजार रूपये याप्रमाणे एकूण 2 कोटी 25 लाख रुपये आरोपीच्या मेसर्स नंदन असोसिएटसच्या खात्यावर आर.टी.जी.एस.द्वारे ट्रान्सपर केले व सदर रक्कम मिळाल्याबाबतच्या पावत्याही घेतल्या.

पुन्हा दुसर्‍यांदा पैश्यांची मागणी
दोन वर्षांनी याबाबत फिर्यादीने प्रोजेक्टबाबत आरोपीस विचारणा केली असता असे सांगण्यात आले की, प्रोजेक्टपासून बराचसा फायदा झालेला आहे परंतु तुम्हास मिळणारी रक्कम ही मी शेअर्समध्ये गुंतवलेली आहे. त्यानंतर देखील आरोपीने फिर्यादीकडून अशाचप्रकारे 15 दिवसांच्या लघू मुदतीसाठी ठेव म्हणून दिनांक 29/11/2021 रोजी 3 कोटी 50 लाख रुपये आर्टिजीएसद्वारे दिले. मुदत संपल्यावर विचारणा केली असता टाळाटाळ करण्यात आली, यासाठी फिर्यादी यांचेकडून सारखा तगादा लावला म्हणून आरोपीने दिनांक 24/2/2022 रोजी मेसर्स नंदन असोसिएट्सचा धनादेश दिला. सदरचा धनादेश बँकेतून न वटता परत आला. त्यानंतर फिर्यादीने आरोपीस याबाबत वकिलामार्फत रजि.नोटीस दिनांक 12 मे 2022 रोजी पाठविली. सदरील रजिस्टर नोटीस आरोपींना मिळाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस दिनांक 23 मे 2022 रोजी दिलेल्या नोटीसला उत्तर देत दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत पैसे परत देण्याचे लेखी आश्वासनाने कळविले होते परंतु फिर्यादीचा आरोपींवर तोपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा विश्वास राहिलेला नसल्याने अखेर फिर्यादींनी आरोपीविरुद्ध इंडियन निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अ‍ॅक्ट कलम 138 प्रमाणे (केस नंबर 519/2022) चाळीसगाव न्यायालयात दाखल केली. त्यानंतर या केसची समन्सची बजावणी आरोपीस झाल्यावर आरोपी व फिर्यादी यांच्यात चाळीसगावी बैठक झाली. यात लघू मुदतीसाठी दिलेली रक्कम 3 कोटी 50 लाख रुपये फिर्यादीस परत करण्यात आले मात्र 2014 मध्ये व्यवसायात यापूर्वी दिलेली दोन कोटी 25 लाख बाबतही यावेळी चर्चा झाली. यातील सुरुवातीला दिलेली मूळ रक्कम व सात- आठ वर्षात मिळालेला नफा व इतरत्र खर्चासह असे एकूण तीन कोटी 82 लाख तुम्हास चेकद्वारे देण्यात येतील, असे आरोपीने फिर्यादीस सांगितले.

साडे तीन कोटी रुपये परत केल्याने फिर्यादीने आरोपीवर त्यावेळी विश्वास दाखविला आणि त्यापोटी आरोपीने एक कोटी 25 लाख रुपयांचा आणि दोन कोटी 57 लाख रुपयांचा असे दोन चेक देतो, आधी न्यायालयातील केस काढा, चेकची रक्कम तुम्हाला निश्चितच मिळेल याची खात्री दिली. आधीची रक्कम मिळाल्यामुळे उर्वरीत चेकचे पेमेंट मिळतील यावर विश्वास ठेवून फिर्यादीने अखेर दिनांक 4/9/2023 रोजी चाळीसगाव येथील न्यायालयात दाखल केलेली केस (केस नंबर 519/2022) काढून घेतली.

चेक न वटता परत आल्याने खटला दाखल
पत्यानंतर आरोपीने दोन्हीही चेकची तारीख आल्यावर आरोपीस विचारून फिर्यादीने दोन्हीही चेक वटविण्यासाठी बँकेत टाकले परंतु आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने चेक परत आले. त्यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून पुन्हा बँकेत सदरचे चेक टाकले असता ते बँकेने न वटविता फिर्यादीस परत केले त्यामुळे याबाबत फिर्यादीने आरोपीशी संपर्क केला असता टाळाटाळ करत असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले म्हणून वकिलांमार्फत आरोपीस नोटीस बजावून पुन्हा चाळीसगाव न्यायालयात आरोपीच्या विरोधात इंडियन निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अ‍ॅक्ट कलम 138 प्रमाणे खटला दाखल केला. याप्रकरणी आरोपीस कठोर शासन व्हावे, चेकमधील नमूद केलेल्या रक्कमेची दुप्पट रक्कम नुकसान भरपाई फिर्यादीस मिळावी, असेही फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांच्यातर्फे अ‍ॅड.सागर साहेबराव पाटील हे कामकाज पाहत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !