भुसावळसह मुक्ताईनगरात धूम स्टाईल मंगळसूत्र चोरी : परप्रांतीय चोरटे जाळ्यात
मुक्ताईनगर : भुसावळसह मुक्ताईनगरात धूम स्टाईल येत मंगलपोत लांबवणार्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शिवाय त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिड लाखांचा मुद्देमाल जप्त
मुक्ताईनगर शहरातील संताजी नगर भागातील रहिवासी प्रज्ञा प्रदीप तळेले या महिलेची मंगलपोत धूम स्टाईल लांबविण्यात आल्याची घटना 13 जानेवारी 2024 रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली होती. यात त्यांच्याकडील सुमारे सात ग्रॅम वजनाच्या सोन्याचे मणी असलेल्या व 30 हजार रुपये मूल्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी लाल रंगाच्या मोटारसायकलीवरून पलायन केले. या संदर्भात मुक्ताईनगर पोलिस स्थानकात 14 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.


35 ग्रॅम सोने जप्त
मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते आणि उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे व त्यांच्या सहकार्यांनी तपासाची चक्रे फिरवली. यात अकोला पोलिस स्थानका दाखल गुन्ह्यातल्या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने मुक्ताईनगर व भुसावळात अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती दिली. या अनुषंगाने संजय ब्रिजमोहन चोकशे (रा.तिल्लोर खुर्द, ता.इंदौर, म.प्र.) आणि शंकर फुलचंद भदोरीया (34, रा.छोटी नदी, पंधाना रोड, खंडवा, जि.खंडवा, म.प्र., ह.मु. किनखेड, पुर्णा, ता.आकोट) यांना अटक करण्यात आली. या आरोपींची कसून चौकशी केल्यावर त्यांनी मुक्ताईनगर तसेच भुसावळ येथील दाखल गुन्ह्यातील सुमारे दीड लाख रुपये किंमतीच 35 ग्रॅम सोने काढून दिले.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, मोतीलाल बोरसे, निलेश श्रीनाथ, . गजानन जाधव, विशाल पाटील यांच्या पथकाने केली.
