डीजेच्या दणदणाटामुळे विद्यार्थ्याचा ओढवला मृत्यू
Student dies due to DJ noise श्रीरामपूर : विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रमात डीजेचा दणदणाट सुरू असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू ओढवला. ही घटना पुणतांबा येथील कृषी तंत्र विद्यालयात घडली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मात्र डीजेचा आवाज नियंत्रणात असल्याने मृत्यूचे कारण वेगळे असू शकते, असा दावा केला. सुयोग कैलास अडसुरे (20, वरवंडी, ता.राहुल) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी विद्यालयाच्या पदविका अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.
आवाजाने छातीत झाला त्रास
विद्यालयाची शुक्रवारपासून परीक्षा सुरू झाल्याने निरोप समारंभामध्ये डीजे लावण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुसार गावातील एक डीजे तेथे लावण्यात आला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हा निरोप समारंभ आयोजित केला होता. दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांचे नाचगाणे सुरू झाले. याच वेळी सुयोगला छातीत त्रास जाणवू लागला. त्याला पुणतांबा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांच्या सूचनेनुसार श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच सुयोग याला मृत घोषित करण्यात आले.

