यावल तालुक्यात दहावीच्या पेपराला 39 विद्यार्थ्यांची दांडी : कॉपी करतांना एक विद्यार्थी डिबार

सहायक पोलीस अधीक्षकांची कारवाई : कॉपी बहाद्दरांच्या गोटात खळबळ


In Yaval taluka, 39 students stick to class 10th paper :  One student debarred while copying यावल : दहावी परीक्षेला शुक्रवार, 1 मार्चपासून सर्वत्र शांततेत सुरू झाली मात्र यावल तालुक्यात पहिल्याच दिवशी मराठी विषयाच्या पेपराला 39 विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर यावल शहरातील डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना तपासणीदरम्यान एक विद्यार्थी कॉपी करीत असताना आढळल्याने त्यास डिबार करण्यात आले. या कारवाईने कॉपी बहाद्दरांच्या गोटात खळबळ उडाली. 10 परीक्षा केंद्रावर तीन हजार 597 विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक लक्ष ठेवून होते व पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तहसीलदार, गटविकास अधिकारी व स्वत : हा सहायक पोलीस अधीक्षकांचे पथक परीक्षेवर नजर ठेवून होते.

भाषेच्या पेपराला 39 विद्यार्थ्यांची दांडी
शहर व तालुक्यात इयत्ता दहावीच्या पेपर सोडवण्याकरीता सकाळ पासूनच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली. सकाळी 10 वाजेपासून प्रत्येक परीक्षा केंद्रावर पालक विद्यार्थ्यांना सोडण्यास आले होते व आलेल्या पालकांची गर्दी झाली होती तर पहिल्या भाषेच्या पेपरला मराठी माध्यम व उर्दू माध्यमाच्या 39 विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. तीन हजार 636 विद्यार्थी प्रवेशित होते त्यापैकी तीन हजार 597 विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. यावल तालुक्यात यावल व फैजपूर शहरसह ग्रामीण भागात दहा परीक्षा केंद्र आहेत. या सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून परीक्षा केंद्रावर बैठा पथकाची नेमणूक करण्यात आली. सकाळी 11 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत साने गुरूजी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर स्वत:हा सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग या पथकासह दाखल झाल्या. प्रत्येक वर्गात स्वत:हा त्यांनी तपासणी केली व तेथून 12 वाजेला त्या डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल केंद्रात दाखल झाल्या. येथे तपासणीत एक विद्यार्थी त्यांना कॉपी करतांना आढळल्याने त्याला डिबार करण्यात आली.



यांचा गस्ती पथकात समावेश
गस्ती पथकात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड, यावलचे सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये, फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाय यांनी विविध केंद्रावर भेट देवून पाहणी केली. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यात दोन कस्टडी असून यावल कस्टडी प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके तर फैजपूर कस्टडी प्रमुख म्हणून पोषण आहार अधिकारी अजीत तडवी हे कामकाज पाहत आहे.

पालकांनी मानसिकता बदलावी
मोठया प्रमाणात यावल शहरातील परीक्षा केंद्रावर पालकच गोंधळ घालतांना दिसून आले व ही बाब विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे. पालकांकडून परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने गर्दी करणे अत्यंत चुकीचे आहे. परीक्षा केंद्रात पेपर सोडवणार्‍या विद्यार्थी वर्गाबाहेरील गोंधळामुळे विचलीत होतांना दिसले. पालकांनीदेखील जवाबदारीने वागले पाहिजे, असे प्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !