पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडे सापडले 45 कोटींचे मेफेड्रोन : झटपट श्रीमंतीची उतरली नशा !
Mephedrone worth 45 crores was found with the Sub-Inspector of Police in Pune : the intoxication of wealth has come down instantly! पिंपरी : रस्त्यावर सापडलेले मेफेड्रोन पोलीस उपनिरीक्षकाने विक्री करण्याचा डाव आखत झटपट श्रीमंत होण्याचा प्लॅन रंगवला मात्र पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच उपनिरीक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या. निगडी पोलीस ठाण्यातील विकास शेळके असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. शनिवारी न्यायालयाने शेळके याला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नमामी शंकर झा (32, रा.निगडी, मूळ रा.बिहार) या संशयिताच्या अटकेनंतर शेळके यास अटक करण्यात आली.
रस्त्यावर पडले मेफेड्रोन अन अधिकार्याची फिरली नियत
गत महिन्यात 26 फेब्रुवारी रोजी रात्री एका गाडीतून मेफेड्रोन असलेले पोते रस्त्यावर पडले. त्यावेळी कार चालक ईश्वर मोटे यांनी ते पोते उघडून पाहिले असता पोत्यात काळसर रंगाचा पदार्थ त्यांना दिसला. कोणत्यातरी कंपनीचा कच्चामाल असल्याचा त्यांचा समज झाला. त्यांनी नाकाबंदीतील पोलीस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण यांच्याकडे त्यावेळी हे पोते दिले. यातील सुधीर ढवळे हा पोलीस उपनिरीक्षक शेळके याचा रायटर असल्याने त्याने याबाबत शेळके यांना माहिती दिली. शेळकेने पोते लपवून ठेवण्यास सांगून कुठे याबाबत वाच्यता न करण्याची सूचना केली. शेळके याने रावेत परीसरातील एका गुन्हेगाराकडे नमामी झा याला पाठवले मात्र गुन्हेगाराने सांगवी येथील एका पोलीस कर्मचार्याला याबाबत टीप दिल्याने प्लॅन फसला. पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


अखेर अधिकार्याला पडल्या बेड्या
एक संशयित विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाल्यानंतर सापळा रचून नमामी झा याला दोन किलो मेफेड्रोनसह ताब्यात घेण्यात आले. उपनिरीक्षक विकास शेळके याने हे ड्रग्स त्याच्याकडे दिल्याचे समोर येताचपोलिसांनी शेळके याच्याकडून 45 कोटी रुपये किंमतीचे 45 किलो मेफेड्रोन जप्त केले.