जळगावात भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार : मयत गाढोद्यातील रहिवासी
Bike rider killed in collision with speeding truck in Jalgaon : Dead is a resident of Ghadhoda जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने गाढोदा, ता.जळगाव येथील 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तरुणाचे काका गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवार, 4 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मानराज पार्कजवळ घडला. संजोग सुरेश सपकाळे (20, रा.गाढोदा, ता.जळगाव) असे मयताचे तर नवल बिसन सपकाळे (47, गाढोदा, ता.जळगाव) असे जखमीचे नाव आहे. अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली.
भरधाव ट्रकने चिरडले
जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे संजोग सपकाळे हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याचे मोठे काका नवल सपकाळे यांच्या मुलाला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने त्याच्या जेवणाचा डबा घेवून नवल सपकाळे आणि संजोग हे दुचाकीने जळगावला येण्यासाठी सोमवार, 4 मार्च रोजी निघाले. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे जात असतांना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार काका पुतणे हे रस्त्यावर कोसळले तर याचवेळी संजोग हा मागून येणार्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू ओढवला तर त्याचे काका यांना दुखापत झाल्याने ते जखमी झाले. अपघातात दुचाकीस्वार तरुणाला ट्रकने चिरडल्यानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला.


ट्रक चालकाला अटक
अपघाताची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणाचा मृतदेह व जखमीला तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तसेच ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अपघातात संजोग हा तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच मयत संजोग याच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. संजोग हा आयटीआयचे शिक्षण घेत असल्याने तो दररोज जळगावला येत होता. परंतु दुर्देवी काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ झाली. कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला होता. संजोग याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.