मोठी बातमी : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा


Big News: Election Commissioner Arun Goyal resigns नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Election Commissioner Arun Goyal)  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता मात्र तत्पूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. राजीनाम्याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. निवडणूक आयोगात यापूर्वीच निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगात आयुक्तांची दोन पदे रिक्त आहेत. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त निवडणूक आयोगात आणखी दोन निवडणूक आयुक्त असतात.

2022 मध्ये स्वीकारला होता पदभार
आता निवडणूक यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आली आहे. अरुण गोयल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत निवडणूक तयारीसाठी अनेक राज्यांचा दौरा केला होता. आता त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे, जो 9 मार्च 2024 पासून प्रभावी मानला जाईल.

दरम्यान, 2022 मध्ये अरुण गोयल यांनी दिल्लीत निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. विशेष म्हणजे अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि दुसर्‍याच दिवशी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.

 


कॉपी करू नका.