जळगावात दालमिल कंपनीत काम करताना मशीनमध्ये स्कार्फ अडकताच महिलेचा मृत्यू
A woman died when her scarf got stuck in the machine while working at Dalmil Company in Jalgaon जळगाव : 35 वर्षीय महिला दालमिलमध्ये काम करीत असताना अचानक मशीनच्या पट्ट्यात महिलेचा स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू :झाला. ही धक्कादायक घटना मंगळवार, 12 मार्च दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सरस्वती गोविंदा ठाकरे (35, रा.सुहागी, ता.खालवा, जि.खंडवा, ह.मु.जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
गळफास बसताच धडावेगळी झाली मान
सरस्वती ठाकरे ही विवाहिता आपले पती गोविंदा नानू ठाकरे आणि तीन मुलांसह एमआयडीसीतील मुकेश ऍग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून कामाला होती. मंगळवार, 12 मार्च रोजी दुपारी दोन वाजता जेवण झाल्यानंतर महिला मजूर सरस्वती ठाकरे या कंपनीत कामावर हजर झाल्या. त्यावेळी मशीनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा मशीनच्या पट्ट्यात अडकला त्यामुळे त्यांच्या गळ्याला फास बसला. हा फास एवढा घट्ट होता की महिलेची मान धडापासून वेगळी झाले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आली.


एमआयडीसी पोलिसांची धाव
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पीएसआय रवींद्र गिरासे, बीट हवालदार ललित नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विवाहितेच्या पश्चात पती दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.