जि.प.अध्यक्षांच्या सरप्राईज व्हिजिटनंतर कर्मचार्यांची भंबेरी
रावेर पंचायत समितीचा बेशिस्त कारभार यापुढे खपवून न घेण्याची दिली तंबी
रावेर : जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी अचानक सप्राईज गुरूवारी पंचायत समिती भेट देताच कर्मचार्यांची भंबेरी उडाली. अनेकांच्या गळ्यात ओळपत्र नव्हते तर अनेक अधिकारी कर्मचारी बाहेर फिरत असल्यो त्यांनीही कार्यालयात धाव घेतली. विशेष म्हणजे अध्यक्षांच्या होमग्राउंड वरील बेशिस्त कारभार पाहून रंजना पाटील कमालीच्या नाराज दिसल्या व त्यांनी यापुढे पंचायत समितीत बेशिस्त कारभार खपवून न घेण्याची तंबीही दिले.
मुख्यमंत्री जिल्ह्यात असतानाही कर्मचारी होते गायब
गुरूवारी दुपारच्या सुमारास जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील यांनी रावेर पंचायत समितीला अचानक भेट दिली. यावेळी अनेक कर्मचारी अधिकारी, बांधकाम अभियंते यांच्या गळ्यात ओळखपत्रे नव्हती तर पंचायत समितीतील हॉलमध्ये प्रचंड बेशिस्त कारभार पाहुन पाटील कमालीच्या नाराज झाल्या. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री जिल्ह्यात असतांना सुध्दा येथील अधिकारी व कर्मचारी गायब होते तर रावेर पंचायत समिती हे जिल्हा परीषद अध्यक्षांचे होमग्राउंड असताना त्यांच्या भेटीप्रसंगी झालेला प्रकार पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘दैनिक जनशक्ती’शी बोलतांना त्या म्हणाल्या की, पंचायत समितीत भेट दिल्यानंतर कोण कर्मचारी व सर्वसाधारण जनता कोण ? हेच मला कळत नव्हत. अनेकांच्या गळ्यात ओळखपत्रे नव्हती, सर्व जण बिनधास्त फिरत होते. हा माझा तालुका असून प्रत्येक जबाबदार व्यक्तीने शिस्तीने राहिले पाहिजे. बेशिस्त वागणूक यापुढे खपवुन घेतली जाणार नाही. यावेळी पंचायत समितीचे सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती पी.के.महाजन, गटविकास अधिकारी सानिया नाकाडे यांनी अध्यक्षांचा सत्कार केला.



