रावेर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही ; राष्ट्रवादीने मात्र मागितली इच्छुकांची नावे
Congress insists for Raver Lok Sabha seat; NCP, however, asked for the names of those interested जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने अलीकडेच उमेदवारांची यादी जाहीर करत जळगावातून स्मिता वाघ तर रावेरातून रक्षा खडसे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला सुटणार म्हणून आमदार एकनाथ खडसे यांनी आपणच उमेदवार राहू, असे जाहीर केल्यानंतर पुढील निर्णय त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने जाहीर करणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसने मात्र रावेरच्या जागेवर दावा केला आहे.
काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी यांच्यासोबत दोन नावे पुढे आली असून त्याला खुद्द जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दुजोरा दिला आहे. एकीकडे काँग्रेस रावेरच्या जागेवर दावा करीत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने इच्छुकांची नावे मागवली असून त्यात चार जणांनी तयारी दर्शविल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले.
लोकसभेसाठी रावेरची जागा पूर्वीपासून काँग्रेसकडे तर जळगावची जागा राष्ट्रवादीकडे आहे. सततच्या पराभवामुळे यंदा रावेरच्या जागेत बदल झाला. या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला. शरद पवार व जयंत पाटील यांनी ही जागा आपल्याकडे असल्याचे सांगून संभाव्य उमेदवार म्हणून एकनाथ खडसेंचे नाव जाहीर केले. खडसेंनीदेखील आपणच उमेदवार राहू असे सतत सांगितले आहे मात्र प्रकृतीचे कारण देत खडसे आता निवडणूक लढवतील ना नाही ? हे लवकरच कळणार आहे.
राष्ट्रवादीच्या या चौघांनी दर्शविली तयारी
राष्ट्रवादी बैठकीच्या प्रारंभी इच्छुकांच्या नावावर चर्चा करून मते जाणून घेण्यात आली. त्यात यावलचे नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी प्राचार्य एस. एस. राणे, माजी आमदार अरुण पाटील, रमेश पाटील या चौघांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. त्याशिवाय भुसावळमधून एका मोठ्या कंत्राटदारानेही इच्छा व्यक्त केली असल्याचे खडसे यांनी सांगितले. अंतिम क्षणी कुणीच निवडणूक लढायला तयार नसेल तर आपण स्वतः लढू, असेही खडसे म्हणाले.


