भुसावळातील ड्रग्ज रॅकेटचे मुंबई कनेक्शन : चौथ्या आरोपीला मुंबईत अटक
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई : ड्रग पेडलरांच्या निशाण्यावर भुसावळातील उच्चभू्र तरुणाई
Mumbai connection of drug racket in Bhusawal : Fourth accused arrested in Mumbai भुसावळ भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेले 73 लाखांचे मेथाक्वॉलोन ड्रग्ज एका हॉटेलमधून जप्त करीत तीन आरोपींना अटक केली होती. या कारवाईनंतर ड्रग्ज पेडलरांचे ड्रग्ज पुरवठ्यासाठी मुंबई कनेक्शन समोर आले होते. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्यानंतर मुंबईतून म्होरक्याला अटक केली आहे. मृदुल चंपकलाल वैद्य (31, भुलेश्वर, चर्नी रोड, मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
डमी ग्राहक पाठवून उळधळा ड्रग्जचा गोरखधंदा
गेल्या काही महिन्यांपासून भुसावळसह परिसरात या ड्रग्जची विक्री सुरू होती मात्र पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी डमी ग्राहक पाठवून ड्रग्ज रॅकेटचा गोरखधंदा उधळला होता. पोलिसांनी कुणाल भरत तिवारी (30, प्लॉट नंबर 24, तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वालाड्यारेस (28, रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगाव रोड, भुसावळ) यांना घटनास्थळावरून तर दीपेश मुकेश मालवीय (31, लाल जैन मंदिरामागे, भुसावळ) याला आरोपींच्या कबुली जवाबावरून अटक केली होती.


गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलिसांना शहरात मेथाक्वॉलोन उत्तेजना व गुंगी आणणार्या प्रतिबंधीत ड्रग्जची विक्री होत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी खबर्यांचे नेटवर्क अॅक्टीवेट करीत संशयितांवर तीन महिने पाळत ठेवली. ड्रग्ज खरेदी करण्यासाठी डमी ग्राहक तयार करीत ड्रग्ज पेडलर्सशी खरेदीसाठी संपर्क साधला व मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील हॉटेल मधूबनमध्ये ड्रग्ज पेडलरांना डीलसाठी बोलावण्यात आले. यावेळी कुणाल व जोसेफ यांच्याशी डमी ग्राहक ड्रग्जची डिल करीत असताना पोलिसांनी छापेमारी करीत दोघांना अटक केली तर संशयितांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून 917 ग्रॅम मेथाक्वॉलोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची एका ग्रॅमची किंमत आठ हजार रुपये असून एकूण 72 लाख 80 हजारांचे ड्रग्ज व 20 हजारांचे दोन मोबाईल मिळून 73 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, आरोपींच्या चौकशीत त्यांनी हे ड्रग्ज आरोपी तथा मुख्य म्होरक्या दीपेश मालवीय याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. मालवीय याने हे ड्रग्ज मुंबईहून आणल्याची कबुली दिल्यानंतर साखळीतील आरोपी मृदुल चंपकलाल वैद्य (31, भुलेश्वर, चर्नी रोड, मुंबई) याच्या मुंबई शहरातून मुसक्या बांधण्यात आल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक शोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, विजय नेरकर, महेश चौधरी, यासीन पिंजारी, भूषण चौधरी, अमर आढाळे आदींच्या पथकाने केली.