‘अंतर्नाद’ पुष्पांजली प्रबोधनमाला यंदा रावेर-यावल तालुक्यात घेणार
भुसावळात आयोजन समितीच्या बैठकीत अध्यक्षांची माहिती
भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गेल्या वर्षापासून स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ पुष्पांजली फिरती प्रबोधनमाला सुरू करण्यात आली आहे. यंदा ही तीन दिवसीय प्रबोधनमाला रावेर व यावल तालुक्यात घेण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी सोमवारी भुसावळातील बैठकीत दिली.
उपक्रमासाठी यांचे सहकार्य
भुसावळ तालुक्यात ग्रामीण भागातील तीन शाळांमध्ये गेल्या वर्षी ही प्रबोधनमाला घेण्यात आली होती. यंदा यावल व रावेर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली. सोशल मीडियाचा वाढता अतिरेक, मनोरंजन वाहिन्यांचे मायाजाल यातून नवी पिढी बाहेर पडावी. त्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने प्रतिष्ठानने ही श्रवणयात्रा आरंभली आहे. तिचे यंदा द्वितीय वर्ष आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात या उपक्रमांतर्गत तीन व्याख्याने घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. उपक्रमाच्या नियोजनासाठी प्रा.डॉ.जतीन मेढे, ज्ञानेश्वर घुले, अमितकुमार पाटील, संजय भटकर, अमित चौधरी, जीवन महाजन, भूषण झोपे, राजू वारके, संदीप सपकाळे, सचिन पाटील, जीवन सपकाळे, विक्रांत चौधरी, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, राजेंद्र जावळे, मंगेश भावे, शैलेंद्र महाजन, देव सरकटे, प्रा. श्याम दुसाने, समाधान जाधव, अमोल भारंबे यांचे सहकार्य लाभत आहे.
दरवर्षी तीन नवीन शाळांत उपक्रम
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्याख्याने ऐकण्याची गोडी लागावी अन् त्यांची पावले ग्रंथालयांकडे वळावी या उद्देशाने या उपक्रमाची मुहूर्तमेढ गेल्या वर्षी करण्यात आली. त्याला मिळालेला प्रतिसाद नजरेसमोर ठेवून यंदा भुसावळच्या शेजारील यावल, रावेर तालुक्यात ही प्रबोधनमाला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. साहित्यिक विद्यार्थ्यांच्या भेटीला यावे असाही या उपक्रमाचा उद्देश आहे, असे संदीप पाटील म्हणाले.