भुसावळातील उच्च शिक्षित अभियंत्याचा खून

दिव दमणला फिरायला गेल्यानंतर किरकोळ वादातून घटना


Murder of a highly educated engineer in Bhusawal भुसावळ : भुसावळातील रहिवासी व पुण्यातील कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाचा मित्रांसोबत दिव-दमणला गेल्यानंतर किरकोळ वादातून खून करण्यात आल्याची घटना बुधवार, 3 रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयीत आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेत धीरज अरुण जाधव (32) या तरुणाचा मृत्यू ओढवला. मयत तरुणावर गुरुवारी रात्री भुसावळात अंत्यसंस्कार करण्यात आले.

किरकोळ वाद बेतला जीवावर
भुसावळच्या नारायण नगरात पोलीस दलातील निवृत्त सहायक फौजदार अरुण जाधव हे परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा धीरज हा पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत आहे. सुटीनिमित्त तो भुसावळात आल्यानंतर मंगळवारी कारने येथून दिव दमणला चुलत भाऊ भूषण व अविनाश जाधव व अन्य दोन मित्रांसोबत गेला होता. बुधवार, 3 एप्रिलला रात्री 9.45 वाजता सर्व मित्र मंडळी जेवणासाठी सुरथी आम्लेट ढाब्यावर आल्यानंतर त्यांच्या गप्पा रंगल्यानंतर हसणे व मजाक सुरू असतानाच समोरील टेबलावरील दाम्पत्यापैकी पुरूषाने काय हसतात ? म्हणून वाद घातला. यावेळी धीरज हा संबंधित पुरूषाला समजावण्यास गेल्यानंतर त्याच्या मानेवर सुरत येथील संशयीताने चाकूने वार केला व वार वर्मी बसल्यानंतर नस कापली गेली. ड्रेसिंग करण्यात आले मात्र मोठ्या हॉस्पीटलमध्ये नेत असताना रक्ताच्या उलट्या होवून धीरजचा मृत्यू ओढवला, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. दरम्यान, धीरजच्या मित्रांनी संशयीत आरोपीला पकडून ठेवल्यानंतर दिव-दमण पोलिसांना बोलावले व आरोपीला त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळात तरुणावर अंत्यसंस्कार
मयत धीरजचा विवाह गेल्या तीन वर्षांपूर्वीच झाला होता. दिवदमण येथून धीरजचा मृतदेह आणल्यावर त्यांच्यावर गुरूवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक झालेल्या धीरजच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे.


कॉपी करू नका.