बेरोजगार युवकांसाठी मोठे उद्योग उभे करणार : श्रीराम पाटील यांची ग्वाही

कुर्‍हाकाकोडा येथे मतदारांच्या घेतल्या भेटीगाठी ः विकासाकडे दुर्लक्ष करणार्‍यांना जागा दाखवू : बी.सी.महाजन

0

Big industries will be set up for unemployed youth: Shriram Patil’s testimony मुक्ताईनगर : कुर्‍हाकाकोडा हा परिसर विकासापासून दुर्लक्षित आहे. या पारिसरात युवकांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी या परिसरात मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभे करू, असे आश्वासन रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. रावेर मतदार संघातील कुर्‍हाकाकोडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

श्रीराम पाटील म्हणाले : उद्योग उभे करणार !
यावेळी संवाद साधताना नागरिकांनी युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मांडला. सर्व समस्या ऐकून घेतल्यावर उमेदवार पाटील यांनी नागरिकांना या परिसरात उद्योग उभे करण्यासाठी भावी काळात आपले प्रयत्न राहतील, असे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, दशरथ कांडेलकर, सरपंच बी.सी.महाजन, संजय पाटील, निलेश पाटील, संतोष बोदडे, दिनेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आश्वासनांच्या सरकारला आता हद्दपार करा : अ‍ॅड.रोहिणी खडसे
अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, ‘सत्ताधार्‍यांच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सत्ताधार्‍यांनी वाढती महागाई, बेरोजगारी ,शेतकर्‍यांना प्रश्न सर्व बाबतीत दिलेले आश्वासने फोल ठरले आहे. मोदींचे सरकार हे फक्त आश्वासनांचे सरकार आहे. मोदींजींनी पेट्रोल, गॅसचे भाव कमी करण्याचे दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी एकही आश्वासन पुर्ण झाले नसून गॅस पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे, रोजगार नसल्यामुळे तरुण वर्ग हतबल झाला आहे, एकीकडे शेतमालाला भाव नाही तर, दुसरीकडे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना शेती कशी कसावी? असा प्रश्न पडला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे चित्र बदलवण्याची वेळ आता आली आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आणू, असे यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले.

अंतुर्लीत श्रीराम पाटील यांचे स्वागत
वढोदा, महालखेडा, निमखेडी, सुकळी, अंतुर्ली, दुई या गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. वढोदा येथे उपसरपंच रंजना कोथळकर, इम्रान काझी, रशीद मेम्बर यांच्यासह नागरिकांशी संवाद साधला. अंतुर्ली येथे नागरिकांनी उमेदवार श्रीराम पाटील यांचे स्वागत केले. यावेळी यु.डी.पाटील, निवृत्ती पाटील, ईश्वर राहणे, पवनराजे पाटील, दिनेश पाटील, विश्वास पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासाकडे दुर्लक्ष करणार्‍यांना जागा दाखवू : बी सी महाजन
गेल्या दहा वर्षात कुर्‍हाकाकोडा परिसराकडे लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केले आहे. अशा उमेदवाराला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असा निर्धार कुर्‍हा परिसरातील नागरिकांनी केला असल्याचे बी.सी.महाजन यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.


कॉपी करू नका.