रब्बी हंगामातील शासकीय हमीभावाने ज्वारीची नोंदणी करून खरेदी केंद्र सुरू करा : आमदार मंगेश चव्हाण

जिल्हाधिकारी व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे मागणी : तर बसू शकतो ज्वारी उत्पादकांना 300 कोटींचा फटका

0

चाळीसगाव : शासनाने रब्बी हंगामातील हमीभावात खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू करण्यात आली आहे मात्र अद्याप ज्वारीची नोंदणी सुरू झालेली नाही. ज्वारीला 3180 रुपये प्रति क्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यांत 2000-2100 रुपये क्विंटल ने ज्वारी खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे क्विंटल मागे सरासरी 1000 रुपयाचे नुकसान होत आहे. मक्याबरोबरच ज्वारीची देखील नोंदणी सुरू करून ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. पत्राची प्रत त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना देखील दिली आहे. शेतकर्‍यांच्या महत्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वीच ग्रामविकास मंत्री गिरीशमहाजन यांनीदेखील याबाबत निर्देश प्रशासनाला दिले होते.

तर ज्वारी उत्पादकांना मोठा फटका
आमदार चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा 48 हजार 403 हेक्टरवर झाला आहे. उत्पादन बाजारात मिळणारा भाव आणि हमीभावातील तफावत पाहिली तर 315 कोटींचा फटका एकट्या ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना बसणार आहे. एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळला असताना रब्बीत कष्टाने पिकविलेल्या पिकांना हमी भावापेक्षा एक हजाराने कमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन लागत आहे.

रब्बी हंगामातील ज्वारीची तात्काळ नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करून ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.


कॉपी करू नका.