शरद पवार स्पष्टच म्हणाले ; देणे-घेणे करून मत मागण्याची आमची भूमिका नाही

0

बारामती : काही लोकांनी कसे मतदान करायचे हे तुम्हाला सांगितले. पण मी तसे सांगणार नाही कारण देणे घेणे करून मत मागण्याची आमची भूमिका नाही, अशी टिका शरद पवार यांनी केली. बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारादरम्यान अजित पवारांनी मतदारांना कचाकचा मतदान करण्याचे आवाहन केल्याने त्यावर शरद पवारांनी उत्तर दिले.

कन्हेरी गावात सभेचे आयोजन
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला. या वेळी कन्हेरी या गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते.

लोकांची कामे करून सेवा करायची ही आमची भूमिका
अनेक लोक काहीतरी सांगत असतात मात्र आपल्याला वाद वाढवायचा नाही, आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही, आपल्याला केवळ तुतारी समोरचे बटन दाबायचे आहे. काल कुणीतरी कसे दाबायचे हे सांगितले. मात्र, मी तसे सांगणार नाही. त्यांनी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, असे देखील म्हटले आहे. मात्र, देणे घेणे करून मत मागण्याची आमची भूमिका नाही. लोकांमध्ये काम करायचे, लोकांना शक्ती द्यायची, लोकांची सेवा करायची आणि मते मागायची ही आमची भूमिका असल्याचा टोला देखील शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

लोकशाहीत मतदारांचा अधिकार टिकायला हवा : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, आज देशांमध्ये लोकशाहीमध्ये वेगळे काहीतरी घडत असल्याची शंका येत आहे आणि तसे घडले तर तुमच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येई. लोकशाहीत मतदारांचा अधिकार कायम राहावा यासाठी आपण जागृत राहायला हवे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. मधल्या काळात काही बदल झाल्यानंतर आपले चिन्ह बदलल्याची आठवण त्यांनी करून दिली.


कॉपी करू नका.