भुसावळकरांना मोठा दिलासा : ‘हतनूर’चे पाणी तापीच्या बंधार्‍यात पोहोचले

महिनाभराची चिंता मिटली : पाण्याचा जपून व काटकसरीने वापराची गरज

0

Big relief for Bhusawalkars: ‘Hatnoor’ water reached Tapi Dam भुसावळ : भुसावळकरांची पाण्यासाठीची चिंता मिटली आहे. हतनूर धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन पालिकेच्या बंधार्‍यात पोहोचल्यानंतर बंधारा ओव्हरफ्लो झाला आहहे. तापीच्या बंधार्‍यात आगामी 28 ते 32 दिवसांपर्यंत हा जलसाठा टिकून राहणार असल्याने मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात आता आवर्तनाची आवश्यकता भासणार आहे. दरम्यान, हतनूरचे आवर्तन गुरुवारी बंधार्‍यात पोहोचल्याने तो असा ओव्हरफ्लो झाला.

गुरुवारी आवर्तनाचे पाणी पोहोचले
भुसावळ शहरासह रेल्वे प्रशासनाच्या बंधार्‍यातील जलपातळी खालावल्याने प्रशासनाने पाटबंधारे विभाग हतनूर धरणाकडून आवर्तन मागवले होते. गेल्या रविवारी धरणातून 1200 क्युसेसने सोडलेले आवर्तन तापी बंधार्‍यात गुरुवारी सायंकाळी पोहोचल्याने आता बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. हतनूरमधून वेळेत आवर्तन मिळाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती टळली आहे. दरम्यान आवर्तन मिळूनही टंचाई कायम राहणार आहे. आठ ते दहा दिवसांआड पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा होईल.

आवर्तनामुळे मोठा दिलासा
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापीपात्रातील निम्म बंधारा व रेल्वे विभागाला पाणीपुरवठा करणार्‍या अपर बंधार्‍यांची जलपातळी घसरली होती. अल्पसाठ्यावर शहरात पाणीपुरवठा केला जात होता. पालिका प्रशासनाने याबाबत पाटबंधारे विभागाकडे मागणी नोंदवली होती. या सोबत रेल्वे व दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रानेही मागणी नोंदवल्यामुळे हतनूर धरणातून यंदाच्या उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन देण्यात आले आहे. जलसाठा सोडण्यात आल्याने गुरुवारी रात्री बंधार्‍यात पाणी पोहोचले यामुळे शहराला दिलासा मिळाला आहे. हतनूरमधून सोडलेल्या आवर्तनास विलंब झाला असता तर शहरात पाणीकपात करावी लागली असती. किंवा पुरवठा ठप्प होण्याचीही भीती होती, मात्र आवर्तनाने दिलासा मिळाला आहे.


कॉपी करू नका.