बोदवड तालुक्यातील पाणी टंचाईवर तत्काळ उपायोजना करा : अ‍ॅड.रोहिणी खडसे

0

Take immediate action on water shortage in Bodwad taluka : Add.Rohini Khadse बोदवड : वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून सर्वाधिक फटका कायम दुष्काळी छायेत असणार्‍या बोदवड तालुक्याला बसत आहे. बोदवड तालुक्यात कोणताही नैसर्गिक पाण्याचा मोठा स्रोत नाही तसेच यावर्षी झालेल्या कमी पावसाळ्यामुळे विहिरींची जलपातळी खालावली आहे त्यामुळे बोदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : तत्काळ हव्यात उपाययोजना
एकीकडे तीव्र पाणीटंचाई असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सध्या लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात आलेली नाहीत त्यामुळे नागरिकांचे तसेच गुरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे. प्रशासनाने आचारसंहिता बाजुला ठेऊन तत्काळ विहिर अधिग्रहण, विहिर खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा उपाययोजना करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

दहा-बारा दिवसाआड पाणी
बोदवड तालुका हा कायम अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात पाण्याचा कुठलाही नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध नाही त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी संपूर्ण तालुक्याला मुक्ताईनगर येथील पूर्णा नदीवरून असलेल्या ओ.डी.ए. पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून रहावे लागते. ओ.डी.ए.योजनेद्वारे बोदवड तालुक्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो परंतु विद्युत पुरवठा आणि काही तांत्रिक कारणाने तसेच ओ.डी.ए. योजनेची पाईप लाईन ही सतत फुटते व ती दुरुस्त करायला विलंब होतो या कारणाने चार पाच दिवसाआड मिळणारे पाणी दहा बारा दिवसाआड मिळते.

बोदवड तालुक्यात सर्वाधिक टंचाई
काही गावांमध्ये थोडा फार पाणीसाठा असलेल्या विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला जातो परंतु यंदा अत्यल्प झालेल्या पर्जन्यमानामुळे विहिरींमध्ये जलसाठ्याची कमतरता आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे त्यामुळे वाढते बाष्पीभवन आणि सततचा होणारा पाणी उपसा यामुळे विहिरींमधील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्याचे दिसून येत आहे त्यामुळे बोदवड तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे यात प्रामुख्याने गोळेगाव बु.॥ गोळेगाव खु.॥, धानोरी, वडजी, वरखेड बु.॥, वरखेड खु.॥, मानमोडी, वराड बु.॥, जलचक्र खु.॥, जलचक्र बु.॥, पळासखेडा, नाडगाव, मुक्तळ, जुनोने या 14 गावांमध्ये नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना तसेच गुरा ढोरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

तर हंडा मोर्चा काढणार
सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत गुंतले असल्यामुळे पाणीटंचाईवर करण्यात येणार्‍या उपाययोजना अजूनपर्यंत झालेल्या नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पाणी विकत घ्यावे लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. जिल्हाधिकारी स्तरावरून उचित कार्यवाही करून आचारसंहिता बाजुला ठेवून तालुका प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन शक्य त्या गावात हिहिरींचे अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, शक्य तिथे नवीन ट्युबवेल कराव्यात जेथे शक्य नसेल तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तत्काळ व्यवस्था करून नागरिकांना, गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून पाणीटंचाईची ताीव्रता कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. तत्काळ उपाययोजना न केल्यास बोदवड तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकरी, महिला गुरा-ढोरांना घेऊन हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


कॉपी करू नका.