तक्रारीत सेंटलमेंटसाठी दोन हजारांची लाच : पवारवाडी पोलीस ठाण्याचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात

0

Bribe of 2000 for settlement in complaint : Constable of Pawarwadi police station in ACB’s net नाशिक : पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीत सेंटलमेंट करून तक्रार दाखल न करण्यासाठी तडजोडीअंती दोन हजारांची लाच स्वीकारणार्‍या मालेगावातील पवारवाडी पोलीस ठाण्यातील हवालदार दिलीप बाजीराव निकम (57, साकोरा, ता.नांदगांव, जि.नाशिक) यास नाशिक एसीबीने बुधवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने पोलीस दलातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे शेती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी मित्र अल्ताफ यास त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी हात-उसणे म्हणून दोन महिन्यांच्या बोलीवर 50 हजार रुपये दिले होते, परंतु दोन महिने पुर्ण होवूनही तक्रारदार यांचा मित्र अल्ताफ हा पैसे देत नसल्याने त्यांच्या वादा-वादी झाली. त्यानंतर अल्ताफ हा 23 रोजी पोलीस स्टेशन, पवारवाडी येथे तक्रारदाराविरोधात तक्रार देण्यासाठी आला. यावेळी हवालदार निकम यांनी तक्रारदार यांना फोन करुन पोलीस स्टेशन पवारवाडी, मालेगाव येथे बोलाविले. तक्रारदार यांनी त्यांचे मेहुणे (दाजी) यांना पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये पाठवल्यानंतर हवालदार निकम यांनी अल्ताफ याची तक्रार न घेणे व कॉम्प्रमाईज करण्याच्या बदल्यात व 50 हजार रुपये काढून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले व एसीबीकडे तक्रार करण्यात आली. बुधवार, 24 रोजी तीन हजार रुपये घेतल्यानंतर एक हजार रुपये तक्रारदाराला परत करण्यात आले मात्र दोन हजारांची लाच घेतल्याने हवालदाराला अटक करण्यात आली. हवालदार निकम याच्याविरोधात छावणी पोलीस स्टेशन, मालेगांव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गंगोडे, हवालदार पंकज पळशीकर, चालक हवालदार विनोद पवार आदींच्या पथकाने यशस्वी केला.


कॉपी करू नका.