लोकसभा निवडणूक नाकाबंदी : यावल तालुक्यात आठ लाख 65 हजारांची रोकड पकडली

वाहन मालकाला खुलासा करता न आल्याने रोकड जप्त

0

Lok Sabha election blockade: Cash of 8 lakh 65 thousand seized in Yaval taluka यावल : यावल तालुक्यातील अकलूद जवळील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाकाबंदी करणार्‍या पथकास एका वाहनात 8 लाख 65 हजारांची रोकड मिळून आली. शुक्रवारी भुसावळकडून चारचाकी वाहन फैजपूरकडे जात असताना वाहन तपासणी करत असतांना त्यात रोकड आढळून आली व संबंधित वाहन मालकाला या रोकड संदर्भात योग्य खुलासा करता न आल्याने ही रोकड जप्त करून वाहनाचा पंचनामा करीत ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आली.

वाहनात आढळली रोकड
अकलूद, ता.यावल येथे भुसावळकडून फैजपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकचे प्रमुख किरण वायसे हे शुक्रवारी वाहन तपासणी करीत असताना पाऊणेदहा वाजता पांढर्‍या रंगाची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एम.एच.19 सी. झेड. 8569) ही आली. पथकातील लोकांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात एकूण 8 लाख 65 हजार 100 रुपयांची रोख रक्कम मिळून आली. वाहन मालक संतोष सुरेशकुमार बत्रा (44, रा.हनुमान नगर, भुसावळ) यांच्याकडे या पैशांची विवरण मागितले असता त्यांच्याकडे व्यवस्थित विवरण नव्हते. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले व रोख रक्कम ही जप्त करून वाहनाचा पंचनामा करण्यात आली व वाहन, रोख रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली. ही रक्कम कुणाकडे व कोणत्या कामासाठी दिली जात होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर या रक्कमेसंदर्भात योग्य खुलासा आपण करणार असल्याचे संतोष बत्रा यांनी सांगितले आहे.


कॉपी करू नका.