हत्या प्रकरण : भुसावळातील दोघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त : रस्त्याच्या दुतर्फा गर्दी
भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखूंडे यांच्या मृतदेहावर जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास मृतदेह वाल्मीक नगर व मोरेश्वर नगरातील घरी आणताच दोघांच्या कुटूंबियांनी टाहो फोडला. यावेळी वाल्मीक नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. अर्ध्या तासात बारसे व राखुंडे यांची एकाचवेळी दोघांच्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात सर्वदूर चोख बंदोबस्त तैनात केला होता.
जीवलग मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
बारसे व राखुंडे हे दोघे जीवलग मित्र असल्याने दोघांच्या मृतदेहावर जळगाव सामान्य रुग्णालयात गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी पाच दरम्यान इन कॅमेरा शवविच्छेदन झाले. सायंकाळी दोन रुग्णवाहिकांद्वारे दोघांचे मृतदेह शहरात आणल्यानंतर सायंकाळी पावणेसात वाजता दोघांच्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास तापी नदीवरील स्मशानभूमीत दोघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.


वाहतूक ठप्प : पोलिसांचा बंदोबस्त
अंत्ययात्रेमुळे जामनेर रोडसह यावलकडून येणारी वाहतूक ठप्प झाली. हजारो नागरिक वाहनांसह पायी अंत्ययात्रेत सहभागी झाल्याने वाहतूक व्यवस्था तासभर कोलमडली होती तर वाय पॉईंटकडून शहराकडे येणार्या वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. शहरात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी लक्ष ठेवून होते. शहरातील वाल्मीक नगरासह सर्वच भागात जिल्ह्यावरून आलेल्या वाढीव कुमकचा बंदोबस्त लावण्यात आला.