भुसावळात मुसळधार पाऊस : झेडआरटीआय बोगदा वाहतुकीसाठी बंद

अडीच तासात 51 मिलिमीटर पावसाची नोंद : नालेसफाई कागदावरच


भुसावळ : शहराला सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने झेडआरटीआय भागातील रेल्वे बोगदा पाण्याने तुंबल्याने रात्रीपासून या भागात वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांचे चांगलेच होत होत आहेत. बोगद्याच्या सदोष कामामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहनधारकांनी प्रशासनाविषयी चांगलाच रोष व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून दमदार पावसाला सुरूवात झाली तर सुमारे अडीच तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 51 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली.

बोगदा वाहतुकीसाठी रात्रीपासून बंद
शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. शहरातील नाल्यांची सफाई झाली नसल्याने नाल्याकाठच्या नागरिकांना त्यामुळे चांगलाच मनस्ताव सोसावा लागला तर पालिकेचे ढिसाळ नियोजनही त्यानिमित्त समोर आले. शहरातील बसस्थानकातही मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला. शहरातील रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरजवळ सुरू करण्यात आलेल्या बोगद्यात सुमारे दोन फूटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. यामुळे या बोगद्यातून येणार्‍या जाणार्‍या वाहनधारकांना त्रास होत असून बोगद्यात वाहने बंद पडत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.



पाण्याचा निचरा होत नसल्याने संताप
मुसळधार पावसाने रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरजवळ सुरू करण्यात आलेल्या बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून असल्याने वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. अनेक वाहने बंद पडल्याने वाहनधारकांना वाहने लोटत न्यावी लागली तर सदोष कामाविषयी वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. बोगद्यात दोन फूटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने रात्री उशिरापासून वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेने बोगद्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट बंद करण्याच्या नादात केलेल्या बोगद्यातील पाणी निचर्‍याचे काम न केल्याने या भागात तलाव साचला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !